Vallari Viraj shares anecdote: अभिनेत्री वल्लरी विराज सध्या ‘शुभ श्रावणी’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. ती या मालिकेत श्रावणी ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे.

मालिकेत येणारे ट्विस्ट, श्रावणी व तिच्या वडिलांमधील दुरावा, वडिलांचे प्रेम मिळवण्यासाठी श्रावणीची धडपड, नंदा आक्काची कारस्थाने, शुभूची असणारी श्रावणीला साथ अशा सर्वच गोष्टी वेळोवेळी लक्ष वेधून घेतात.

आता झी मराठी वाहिनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिला एक चिठ्ठी दिली जाते. त्यामध्ये काय लिहिले आहे हे वल्लरी वाचते. ती म्हणते, “अशी एखादी गोष्ट जेव्हा तू खूप पॅनिक झाली होतीस, पण आता तुला वाटतं की तू ती लाईटली घ्यायला हवी होतीस.”

“काही वर्षांपर्यंत माझ्या चेहऱ्यावर…”

पुढे वल्लरी म्हणते, “काही वर्षांपर्यंत माझ्या चेहऱ्यावर खूप मुरूम होते. कॉलेजमध्ये असल्यापासूनच माझ्या चेहऱ्यावर मुरूम होते. मला खूप लाज वाटायची. घरातून बाहेर पडूच नये, असं मला वाटायचं. मी कधी कधी कॉलेजमध्ये जायचे नाही, कारण मला वाटायचे की माझ्या चेहऱ्यावर खूप मुरूम आहेत, मी कशी दिसतेय वगैरे असं मला वाटायचं.”

वल्लरी असेही म्हणाली, “मला वाटतं की मी ते खूपच गांभीर्याने घेतलं, मी ते स्वीकारायला हवं होतं. मी ते लाईटली घ्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, हे सगळ्यांबरोबरच होतं, इतकी मोठी गोष्ट नाहीये असं आता मला वाटतं”, असे म्हणत चेहऱ्यांवर येणाऱ्या मुरूमांची तिला भीती वाटायची, लाज वाटायची असे वल्लरीने सांगितले.

वल्लरी विराज ही याआधी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत तिने लीला ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते. लीला-एजेची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. या मालिकेला, मालिकेतील पात्रांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती.

वल्लरी विराज मालिकेबरोबरच तिच्या डान्ससाठीदेखील ओळखली जाते. तिचे डान्सचे अनेक व्हिडीओ ती शेअर करत असते. आलापिनी निसळ आणि तिचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यांचे हावभाव, गाण्यांची निवड, तसेच कपड्यांची निवड यांमुळे त्यांचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते.

दरम्यान, ‘शुभ श्रावणी’ मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.