Vanita Kharat Dream Home : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री वनिता खरात घराघरांत लोकप्रिय झाली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत तिने प्रत्येकाची मनं जिंकून घेतली आहेत. काही दिवसांपूर्वीच वनिताने वैयक्तिक आयुष्यातील एक खास गोष्ट आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली. आपलं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. वनिताचं हे स्वप्न नुकतंच पूर्ण झालं आहे.
वनिताने काही दिवसांपूर्वीच तिचं हक्काचं घर खरेदी केलं आहे. याची झलक तिने व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांना दाखवली. वनिताला जेव्हा पहिल्यांदा नव्या घराचा ताबा मिळाला तेव्हा हास्यजत्रेचे काही कलाकार सुद्धा तिच्या नव्या घरी पोहोचले होते. फ्लॅटचा ताबा मिळाल्यावर वनिताने आता तिचं हे ड्रीम होम तिला हवं तसं सजवलं आहे. याचा व्हिडीओ वनिताने नुकताच शेअर केला आहे.
वनिता म्हणते, “घर घेतल्यावर…खरंतर घर घ्यायच्या आधीच माझं ठरलं होत की, माझं घर कसं दिसेल कसं असेल, अगदी तसंच्या तसं किंबहुना त्याहून खूप सुंदर घर सजवलंस तू विनायक. मी तुझ्या हातात मोकळा ‘फ्लॅट’ दिला होता तू त्याचं प्रचंड सुंदर ‘घर’ तयार केलंस. विनायक तुला प्रचंड घट्ट मिठी आणि आयुष्यभरासाठी प्रेम”
वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका खास गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने आरशाच्या बाजूला पाच फोटो फ्रेम्स लावल्या आहेत. या फ्रेम्सवर तिच्या आवडीच्या कलाकारांचे फोटो लावण्यात आले आहेत. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील, दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, अभिनेत्री रंजना, विद्या बालन आणि सुपरस्टार अशोक सराफ या पाच जणांचे फोटो अभिनेत्रीने तिच्या घरात लावले आहेत. वनिताच्या घरातील या खास कॉर्नरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

वनिताचं नवीन घर खूपच सुंदर सजवण्यात आलं आहे. प्रशस्त हॉल, बेडरूम, डायनिंग टेबल या सगळ्याची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओवर मराठी कलाकारांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नम्रता संभेराव म्हणते, “सुंदर सुटसुटीत वास्तू माहोल…” तर, मुक्ता बर्वे या व्हिडीओवर कमेंट करत लिहिते, “किती सुंदर गं…खूप अभिनंदन”
रेश्मा शिंदे, शिवाली परब, अश्विनी कासार, ऋतुजा बागवे, प्रसाद जवादे, रोहित माने, भक्ती देसाई यांसारख्या असंख्य कलाकारांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत वनिताच्या नव्या घराचं कौतुक केलं आहे.

