Star Pravah Serial : मराठी सिनेविश्वातील ‘वंडरगर्ल’, ‘ड्रीमगर्ल’ म्हणून वर्षा उसगांवकर यांना ओळखलं जातं. गेल्यावर्षी त्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये झळकल्या होत्या. चित्रपट असो किंवा मालिका सगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘खट्याळ सून नाठाळ सासू’, ‘तुझ्याविना करमेना’, ‘हमाल दे धमाल’, ‘गंमत जंमत’ अशा बऱ्याच सिनेमांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे.
वर्षा उसगांवकरांनी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत नंदिनी शिर्केपाटील म्हणजेच ‘माई’ ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका सर्वत्र प्रचंड गाजली होती. घराला जोडून ठेवणाऱ्या माई, गौरी-जयदीपला क्षणोक्षणी आधार देणाऱ्या माई प्रेक्षकांना खूपच भावल्या.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेनंतर प्रेक्षक त्यांना छोट्या पडद्यावर प्रचंड मिस करत होते. प्रेक्षकांच्या लाडक्या माईने ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुद्धा तुफान गाजवलं. ‘बिग बॉस’च्या घरातील ज्येष्ठ सदस्य असूनही त्या खेळात शेवटच्या आठवड्यापर्यंत पोहोचल्या होत्या.
आता वर्ष उसगांवकर पुन्हा एकदा सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या मालिकेत एन्ट्री घेणार आहेत? जाणून घेऊयात…
वर्षा उसगांवकर ‘स्टार प्रवाह’च्या ‘नशीबवान’ मालिकेत एन्ट्री घेणार आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत सुद्धा त्या ‘माई’ म्हणूनच एन्ट्री घेणार आहेत. त्या गिरिजाला नागेश्वरबरोबर लढण्यासाठी बळ देणार आहेत. माई गिरिजाला म्हणतात, “तुझी रक्षणकर्ती तूच आहेस पोरी…तुझ्या मनगटातील बळ तू सर्वांना दाखव…कर दोन हात!”
दरम्यान, ‘नशीबवान’ मालिकेचा हा विशेष भाग ३० डिसेंबरला रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. याच भागात वर्षा उसगांवकरांची एन्ट्री होणार आहे. नेटकऱ्यांनी माईंचं कमबॅक पाहून या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या ‘नशीबवान’ मालिकेत अजय पूरकर, आदिनाथ कोठारे, नेहा नाईक, सोनाली खरे, प्राजक्ता केळकर, सानिका मोजर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
