Veen Doghantali Hi Tutena Promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सध्या स्वानंदीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अलीकडेच राजवाडेंच्या घरात स्वानंदीच्या पहिल्या मंगळागौर कार्यक्रमाचं खास आयोजन करण्यात आलं होतं. पण, यावेळी तिला केवळ अपमान सहन करावा लागला. मल्लिका काकूंनी डाव रचल्यानुसार घरी आलेल्या बायका स्वानंदीला तिचं वय विचारतात आणि ती ३५ वर्षांची आहे, हे समजल्यावर या बायका तिच्या मातृत्त्वावर भाष्य करतात. “३५ वर्षांची झालीयेस..आता तुला मूल होणार नाही आणि झालं तरी ते बाळ धडधाकट असेल याची काही शाश्वती नाहीये” असं तिला सगळ्यांसमोर बोललं जातं.

स्वानंदीचा अपमान झाल्यावर मल्लिका काकू मनातल्या मनात खूप खूश होते. तर, दुसरीकडे स्वानंदी प्रचंड दुखावली जाते. शेवटी स्वानंदीच्या पाठिशी उभा राहतो तिचा नवरा. स्वानंदी समरला विचारते, “खरंच उशीर झालाय का या सगळ्याला? आई-वडील होणं खरंच खूप मोठी जबाबदारी असते ना?”

यावर समर म्हणतो, “एका छोट्याशा जीवाला शून्यातून निर्माण करणं..मला वाटत नाही ती फक्त बायोलॉजिकल प्रोसेस आहे, ती खरंतर मानसिक अवस्था जास्त आहे.” समर स्वानंदीच्या अस्वस्थ मनाला एक नवीन उमेद देणार आहे.

आता समर-स्वानंदी हे दोघंही अष्टविनायक यात्रेला जाणार आहेत. यावेळी स्वानंदी बाप्पाला म्हणते, “गजानना आमच्या संसारात कोणतीही कमी राहू नये…” तर, मिस्टर राजवाडे देवाकडे स्वानंदीच्या मनातील सगळी चिंता, अस्वस्थता दूर कर असं मागणं मागतात.

समर-स्वानंदी बाप्पाचा आशीर्वाद घेत असताना एक मुलगा अचानक येतो आणि समरकडे मोदक मागतो. समर त्या मुलाला मोदक द्यायला वळतो, त्यावेळी हा मुलगा तिथे नसतोच. आता समर-स्वानंदीला या यात्रेदरम्यान नेमका कसा अनुभव येणार, स्वानंदीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील का? हे १७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबरच्या विशेष भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.