Veen Doghantali Hi Tutena : मूल जन्माला घालायचं की नाही हा पूर्णत: संबंधित स्त्रीचा निर्णय असतो, याच संवदेनशील विषयावर आधारित ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचे सध्याचे एपिसोड आहेत. समरने आपल्या बहिणीला म्हणजेच अधिराला अतिशय लाडात वाढवलेलं असतं. सध्या ती हळुहळू सरपोतदारांच्या घरात स्थिरावतेय. पण, यादरम्यान स्वानंदीच्या आईमुळे सरपोतदारांच्या घरात मोठा वाद निर्माण झाला आहे.

मातृत्वासारखी मोठी जबाबदारी स्वीकारण्याची सध्यातरी अधिराची मानसिक तयारी झालेली नाहीये. अधिराला सध्या स्वत:च्या करिअरकडे लक्ष द्यायचंय त्यामुळे तिला इतक्यात मूल नकोय. पण, सुनेचा हा निर्णय मंदाकिनीला पटत नाही. या अत्यंत संवेदनशील कारणावरून मंदाकिनी घरात वाद घालते, कोणाचंही काहीच ऐकून घेत नाही. शेवटी कंटाळलेली अधिरा स्वानंदीला फोन करून घरी बोलावून घेते.

स्वानंदी अगदी ठामपणे अधिराची बाजू घेते आणि स्वत:च्या आईला सुद्धा खडेबोल सुनावते. स्वानंदी म्हणते, “शरीर तिचं आयुष्य तिचं…त्यामुळे मूल जन्माला घालायचंय की नाही हा निर्णय फक्त आईचा असायला हवा…मूल जन्माला केव्हा घालायचं आणि ते कोणत्या परिस्थिती घालावं हा निर्णय देखील आईचाच आहे. मूल होऊ द्यायचं नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही. माझं इतकंच म्हणणं आहे की, मूल व्हावं की नाही हा निर्णय त्या आईचाच असायला हवा बास!”

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. असा संवेदनशील विषय मालिकेच्या माध्यमातून हाताळल्यामुळे लेखकांचं कौतुक करण्यात येत आहे. “मस्त… असं काहीतरी दाखवा जेणेकरून लोक बघून जरा तरी काही संदेश घेतील”, “स्वानंदी काय सुंदर सांगितलंस”, “जर आई-वडील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील आणि त्यांची इतक्या लवकर मूल होण्यासाठी तयारी नसेल, तर त्यांच्यावर कोणीही दबाव टाकू नये, अगदी घरातील मोठ्यांनीसुद्धा नाही. काय सुंदर विषय हाताळलाय” अशा असंख्य कमेंट्स या मालिकेच्या प्रोमोवर आल्या आहेत. सर्वत्र लेखकांसह स्वानंदी या तेजश्री प्रधानने साकारलेल्या भूमिकेचंही कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही समर-स्वानंदीच्या आयुष्यावर आधारित मालिका झी मराठीवर दररोज सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाते.