Zee Marathi Serial Veen Doghantali Hi Tutena & Tarini : ‘झी मराठी’च्या सगळ्याच मालिकांच्या टीआरपीमध्ये गेल्या काही महिन्यांत वाढ झाल्याचं चित्र आहे. बहुतांश मालिका स्लॉट लीडर्स ठरत आहेत. ‘लक्ष्मी निवास’, ‘कमळी’, ‘देवमाणूस’ या मालिकांना चांगला प्रतिसाद मिळत असतानाच गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात आणखी दोन मालिका ऑन एअर झाल्या आणि एकाच दिवशी सुरू झालेल्या या दोन्ही मालिका आता वर्षभरात सुपरहिट ठरल्या आहेत. या दोन मालिका आहेत तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि शिवानी सोनार मुख्य भूमिकेत असलेली ‘तारिणी’!
‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘तारिणी’ या दोन्ही मालिका ११ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. तेजश्रीची मालिका सायंकाळी ७:३० वाजता ऑन एअर होते तर, शिवानी मालिका रात्री ९:३० च्या स्लॉटला प्रसारित केली जाते. अल्पावधीतच या दोन्ही मालिकांना चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. सलग काही दिवस या मालिका स्लॉट लीडर सुद्धा ठरल्या आहेत. आज दोन्ही मालिकांना एक वर्ष पूर्ण झालं.
यानिमित्ताने सुबोध भावेने मालिकेच्या संपूर्ण टीमचा फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. अभिनेता लिहितो, “आज ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेला सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झालं. समर राजवाडे ही छान व्यक्तिरेखा मिळाली. यानिमित्ताने अनेक नवे सहकलाकार मित्र भेटले, तुमच्यासारखे प्रेम करणारे रसिक प्रेक्षक आयुष्यात आले आणि पुन्हा एकदा झी मराठीबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आमचे निर्माते हेमंत सोनावणे यांची ही पहिली निर्मिती असलेली मालिका. त्यांनी आम्हाला सगळ्यांना एखाद्या कुटुंबासारखं सांभाळलं आहे. आमच्या संपूर्ण संघाला शुभेच्छा आणि तुम्हा सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार!”
तर, तारिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिवानी सोनारने गेल्या वर्षभरातले ‘तारिणी’च्या शूटिंगदरम्यानचे, झी मराठीच्या इव्हेंटमधील अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये या कलाकारांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग किती छान आहे हे सुद्धा पाहायला मिळतंय.
सुबोध भावे आणि शिवानी सोनार या दोन्ही कलाकारांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे आणि या दोन्ही मालिकांच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, आता येत्या वर्षात या दोन्ही मालिकांमध्ये काय-काय पाहायला मिळणार? समर-स्वानंदीची लव्हस्टोरी कोणतं वळण घेणार, काकू दोघांना वेगळं करेल का? आणि दुसरीकडे खांडेकरांच्या घरातला गुन्हेगार तारिणी शोधू शकेल का? हे मालिकांच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळेल.
