Veen Doghantali Hi Tutena Promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत नुकतीच समर-स्वानंदीने एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला समर स्वानंदीला एका गार्डनमध्ये नेतो आणि तिथे एकदम अनोख्या स्टाइलने प्रपोज करतो. पण, त्यावेळी स्वानंदी त्याला काहीच उत्तर देत नाही. यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी या दोघांनीही आपल्या मनातल्या भावना कबूल केल्या…इतकंच नव्हे तर स्वानंदी तिच्या मिस्टर राजवाडेंना ‘आय लव्ह यू’ सुद्धा म्हणाली. समर-स्वानंदीमधलं प्रेम बहरतंय हे पाहून सगळ्यात जास्त आनंद आजीला झालेला आहे. वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर आजी या दोघांनाही सुखाने संसार करा असा आशीर्वाद देते.
पण, आता समर-स्वानंदीच्या सुखी संसारात अडथळे निर्माण करण्यासाठी मल्लिका आणि अंशुमन हे दोघंही कटकारस्थानं रचताना दिसतील. मल्लिका लेकाला सांगते, “काहीही करून समर-स्वानंदीमधलं अंतर वाढलं पाहिजे…” एकंदर दोघांमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा असा डाव मल्लिकाने रचलाय.
समर-स्वानंदी एकत्र रोमँटिक गप्पा मारत असताना मल्लिका डोकेदुखीचं नाटक करण्यास सुरुवात करते. समर-स्वानंदी दोघंही मल्लिकाला नेमकं काय झालंय हे पाहण्यासाठी येतात. यावेळी मल्लिका काकू नाटक करत म्हणते, “समर माझं डोकं खूप दुखतंय…मला वाटतंय माझ्या डोक्यात गाठ आलीये” यानंतर समर तिला डॉक्टरकडे जाऊयात असं सांगतो.
दुसरीकडे, कपटी अंशुमन स्वानंदीला तोंडावर थेट चॅलेंज देतो. तो म्हणतो, “तुम्हाला आम्ही कसं डिस्टर्ब केलं पाहिलंस ना…आता सहा महिन्यांत तुम्हाला वेगळं करून दाखवतो” आता अंशुमनचं म्हणणं खरं होणार की, स्वानंदी त्याला पुरून उरणार हे प्रेक्षकांना येत्या सहा महिन्यांत पाहायला मिळेल.
नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “काहीही हं काकू…किती नाटक करताय”, “अंशुमन मस्त जोक मारतोय”, “आता अंशुमन-मल्लिका व्हर्सेस स्वानंदी पाहायला मिळेल”, “या काकू समर-स्वानंदीला सुखाने जगू देणार नाहीत”, “आता खरी लव्हस्टोरी सुरू होणार”, “अंशुमनला चांगली अद्दल घडवा”, “बघुया आता कोण जिंकतंय” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा हा विशेष भाग ४ आणि ५ जुलैला सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाईल.
