Veen Doghantali Hi Tutena Promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत आता अंशुमनच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू होणार आहे. खरंतर, स्वानंदी पहिल्यापासून या सगळ्याच्या विरोधात असते कारण, अंशुमन आणि मल्लिकाचा स्वभाव कसा आहे हे तिला माहिती असतं. पण, फक्त समरने सांगितल्यामुळे अंशुमनच्या लग्नात ती आनंदाने सहभागी व्हायला तयार होते. यादरम्यान एक मोठा ट्विस्ट ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत येणार आहे. स्वानंदीची शंका अखेर खरी ठरली आहे.

चिंगी ही राजवाडेंच्या घरात काम करत असते. जेवण, नाश्ता आणि घरातल्या अन्य जबाबदाऱ्या ती व्यवस्थित पार पाडत असते. समर-स्वानंदीसह आजीचा सुद्धा चिंगीवर विश्वास असतो. पण, अंशुमनच्या मनात पहिल्या दिवसापासून चिंगीबद्दल आकर्षण असतं. ज्यावेळी समर तिला सर्वांना ‘दादा’ म्हण असं सांगतो, तेव्हाही ते अंशुमनला पटलेलं नसतं. अखेर जी भीती स्वानंदीच्या मनात असते…तिच आता खरी होणार आहे.

चिंगी गरोदर असून, तिच्या पोटात अंशुमनचं बाळ असतं. चिंगीचे प्रेग्नन्सी रिपोर्ट्स स्वानंदीच्या हाती लागतात. हे रिपोर्ट्स पाहून स्वानंदीला धक्का बसतो. ती याबद्दल चिंगीला जाबही विचारते. “अगं मुली तू काय केलंयस तुला कळतंय का?” यावर चिंगी हतबल होत स्वानंदीलाच विचारते की, “आता मी काय करू?” यावर अंशुमन-चिंगीचं लग्न लावून द्यायचं हा एकमेव मार्ग स्वानंदीसमोर असतो.

स्वानंदी चिंगीला घेऊन लग्नमंडपात जाते आणि अंशुमचं लग्न थांबवते. स्वानंदी म्हणते, “थांबा! हे लग्न होऊ शकत नाही. काकू… या घराची लाज तुमचा मुलगा घालवतोय. राजवाडे I Am Sorry पण हे लग्न होऊच शकत नाही.” आता स्वानंदी चिंगी प्रेग्नंट असल्याचं भर लग्नमंडपात सर्वांसमोर सांगणार की, समरला विश्वासात घेऊन त्याला सगळ्या गोष्टींची कल्पना देणार हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा हा विशेष भाग १ जूनला सायंकाळी ७:१५ वाजता प्रसारित केला जाईल. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “ये हुई ना बात…अंशुमन-अर्पिताचं भांडं फुटणार”, “स्वानंदी रॉक्स”, “आता खरी मजा येणार…काकूचा पैशांचा स्टेटस, इगो, माज सगळं काही स्वानंदी उतरवेल”, “आता चिंगी गरोदर असल्यामुळे स्वानंदी अंशुमन-चिंगीचं लग्न लावेल”, “लग्न झाल्यावर अजून मजा येईल”, “मजाच आली…काकूची जिरणार” अशा भन्नाट कमेंट्स या मालिकेच्या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका सध्या ४५ मिनिटं प्रसारित केली जात आहे. आता चिंगीला न्याय मिळवून देण्याच्या निर्णयात समर राजवाडे स्वानंदीला कशी साथ देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.