Zee Marathi Awards 2026 Winner Mallika : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेने यंदाच्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात सर्वाधिक १३ अवॉर्ड्स जिंकत बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. सर्वोत्कृष्ट नायक, मैत्री, व्यक्तिरेखा, खलनायक-खलनायिका अशा बऱ्याच पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे. समरची काकू मल्लिका आणि तिचा मुलगा अंशुमन या दोघांना निगेटिव्ह भूमिकेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कपटी मल्लिकाची भूमिका साकारत आहेत लोकप्रिय अभिनेत्री किशोरी अंबिये. पुरस्कार जिंकल्यावर त्यांनी खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मल्लिकाचं विजेती म्हणून नाव घोषित करताच ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या टीमकडून सर्वत्र एकच जल्लोष करण्यात आला. यानंतर मंचावर जाण्यापूर्वी किशोरी अंबिये यांनी अशोक सराफ यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.
पुरस्कार जिंकताच किशोरी अंबिये भावना व्यक्त करत म्हणाल्या, “सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा अवॉर्ड स्वीकारतानाचा खास क्षण. मी आज ‘झी मराठी’सह ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या संपूर्ण टीमचे आभार मानू इच्छिते. तुमचं प्रेम, कौतुक आणि पाठिंबा असाच कायम राहुद्यात. निर्मात्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला मल्लिका साकारण्याची संधी दिली, यासाठी त्यांचेही आभार. माझ्या सहकलाकारांचे तसेच सेटवरच्या प्रत्येकाचे मी आभार मानते….सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे आई-बाबा आणि कुटुंबीय. त्यांच्या सपोर्टशिवाय हे काहीच शक्य नव्हतं. God Is Great! तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे मला कायमच प्रेरणा मिळत आलीये. यापुढेही मी तुम्हा सर्वांचं असंच मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन.”
किशोरी अंबिये यांनी शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाकारांसह त्यांच्या सहकलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, झी मराठीवर ही मालिका सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये किशोरी अंबिये यांच्यासह तेजश्री प्रधान, सुबोध भावे, पूर्णिमा डे, राज मोरे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
