Veen Doghantali Hi Tutena : ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या एका अतिशय मनोरंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत एका अशा पात्राची एन्ट्री झाली आहे, ज्यामुळे कथानकात मोठी उलथापालथ होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पूर्वा गोखले या मालिकेत ‘किमया’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून, या निमित्ताने प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पुन्हा एकदा झी मराठीच्या कुटुंबात परतली आहे. किमया हे केवळ एक नवीन पात्र नसून ती समरची जुनी मैत्रीण आणि त्याची Ex-गर्लफ्रेंड आहे. परदेशातून भारतात परतल्यानंतर ती थेट समरच्या घरी राहायला येते, ज्यामुळे घरातील वातावरण आणि नात्यांची समीकरणं पूर्णपणे बदलून जाणार आहेत.

पूर्वा गोखले आपल्या भूमिकेविषयी सांगते, “किमया’ ही अतिशय मनमोकळी आहे. जे मनात असेल ते स्पष्टपणे बोलणारी ती मुलगी आहे. किमया आणि समरची मैत्री खूप जुनी आणि घट्ट असल्याने त्यांच्यातील जवळीक पाहून स्वानंदीच्या मनात जेलसी निर्माण होताना दिसणार आहे. ४० वर्षांची असूनही किमयाचा उत्साह एखाद्या विशीतल्या मुलीसारखा आहे. पाश्चिमात्य पेहराव आणि बिनधास्त स्वभाव यामुळे हे पात्र प्रेक्षकांना नक्कीच वेगळं आणि मनोरंजक वाटेल. यानिमित्ताने सुबोध आणि मी तब्बल १५-१६ वर्षांनी छोट्या पडद्यावर एकत्र दिसत आहोत.”

‘कुलवधू’ मालिकेमुळे विक्रमादित्य आणि देवयानी यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली होती. तेव्हापासून ही जोडी पुन्हा एकत्र कधी दिसणार, अशी विचारणा चाहते सातत्याने करत होते.

…म्हणून किमयाची भूमिका स्वीकारली

पूर्वा याबद्दल सांगते, “मला आशा आहे की, हे भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचे दिग्दर्शक ‘कुलवधू’च्यावेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते, त्यामुळे सेटवर मला ‘कंफर्ट झोन’ मिळाला आहे. जुनी मैत्री असल्याने सुबोधसह काम करताना मजा येतेय… कोणताही संकोच वाटला नाही.”

“गेल्या काही काळापासून मी हिंदी मनोरंजनसृष्टीत व्यग्र होते, त्यामुळे मराठी प्रेक्षकांपासून काहीशी दूर झाले होते. यादरम्यान मराठी प्रेक्षक वारंवार मला पुन्हा मराठी मालिकांकडे वळण्याची विनंती करत होते. किमयाच्या निमित्ताने एक सशक्त आणि आव्हानात्मक पात्र मिळाल्यामुळे मी हा रोल स्वीकारला. जेव्हा किमयाचा प्रोमो प्रेक्षकांनी पहिला तेव्हा जो उदंड प्रतिसाद मिळाला, त्यावरून आमची जोडी आजही प्रेक्षकांच्या तितकीच पसंतीस उतरत असल्याचं सिद्ध झालं आहे.” असं पूर्वा गोखलेने सांगितलं.

दरम्यान, आता किमायाच्या येण्याने समर आणि स्वानंदीच्या आयुष्यात काय वादळ येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तेजश्री प्रधानची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका दररोज संध्याकाळी ७:१५ वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.