Veen Doghantali Hi Tutena : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत काही दिवसांपूर्वीच समर-स्वानंदीच्या आयुष्यात किमया नावाचं वादळ आल्याचं पाहायला मिळालं. किमया ही समर राजवाडेंची खूप जवळची मैत्रीण अन् त्यांची एक्स गर्लफ्रेंड सुद्धा असते. किमयाच्या एन्ट्रीनंतर स्वानंदीला पहिल्यांदाच समरवर असलेल्या प्रेमाची जाणीव होते. पार्टीत दारू प्यायल्यावर स्वानंदी समरसमोर आपल्या प्रेमाची कबुली सुद्धा देते. पण, तिने ड्रिंक केलं असल्याने समर तिच्या कोणत्याच बोलण्यावर विश्वास ठेवत नाही.

समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणाऱ्या या किमयाची भूमिका मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा गोखलेने साकारली आहे. ‘कुलवधू’ मालिकेपासून पूर्वाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय प्रेक्षक अनेक वर्षे सुबोध भावे अन् पूर्वा गोखले यांच्या जोडीला सुद्धा ऑनस्क्रीन पाहणं मिस करत होते. अखेर, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण झाली. पण, आता लवकरच पूर्वा या मालिकेतून निरोप घेणार आहे. पूर्वाने साकारलेली किमयाची भूमिका ही पाहुण्या कलाकाराची होती.

त्यामुळे पूर्वाने ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या सेटवर केक कापून छान सेलिब्रेशन केलं आणि सर्वांना निरोप दिला. यावेळी मालिकेची संपूर्ण टीम तिला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होती. या पोस्टसह पूर्वाने सेटवरचे काही Unseen फोटो सुद्धा सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पूर्वा गोखले लिहिते, “किमया…ती एका वादळासारखी आली अन् हळुवारपणे या मालिकेचा एक भाग झाली. या भूमिकेला खूप प्रेम मिळालं…किमया नावाचं हे वादळ घराघरांत लोकप्रिय ठरलं. ही भूमिका पाहुण्या कलाकाराची होती त्यामुळे अवघ्या १५ दिवसांतच मी तुमचा निरोप घेतेय. माझ्यावर तुम्ही सर्वांनी खूप प्रेम केलं…आपुलकीने मला आपलंसं केलंत, माझं भरभरून कौतुक केलं यासाठी आभार मानते. मी तुम्हा सर्वांची ऋणी आहे, कृतज्ञ आहे.”

पूर्वाने या पोस्टमध्ये पुढे, ती या सगळ्या सहकलाकारांना मिस करेल असंही लिहिलं आहे. “या सेटवर काम करताना अगदी माझ्या घरच्यासारखं वाटलं…माझ्या सगळ्या सहकलाकारांना मी मिस करेन.” असं सांगत पूर्वाने सहकलाकारांसह निर्मात्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, पूर्वाने शेअर केलेल्या पोस्टवर तेजश्रीने ‘मिस यू टू’ अशी गोड कमेंट केली आहे. तसेच पूर्वाच्या असंख्य चाहत्यांनी तिच्याकडे छोट्या पडद्यावर असंच काम करत राहा अशी मागणीही केली आहे.