Veen Doghantali Hi Tutena New Actress Entry : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत हळुहळू समर-स्वानंदीमध्ये मैत्रीचं नातं बहरत जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला या नवरा-बायकोमध्ये कायम खटके उडत असायचे. पण, आता हळुहळू समरला स्वानंदीचा खरा स्वभाव, तिचा स्पष्टवक्तेपणा या सगळ्याची जाणीव झालेली आहे. आश्रमाच्या कामात सुद्धा तो स्वत:हून आपल्या बायकोच्या मदतीसाठी जातो. समर-स्वानंदीचं हे बॉण्डिंग आता अजून घट्ट होईल असं सर्वांनाच वाटत होतं पण, या दोघांमध्ये आता एन्ट्री होणार आहे ‘तिची’…
समरची एक्स गर्लफ्रेंड या दोघांच्या आयुष्यात एन्ट्री घेणार आहे. इतकंच नव्हे तर राजवाडेंची ही जुनी मैत्रीण थेट स्वानंदीला भेटायला जाणार आहे. या दोघी आमनेसामने आल्यावर स्वानंदी बरोबर तिची बोलती बंद करणार आहे. आता मालिकेत समरच्या जुन्या मैत्रिणीची भूमिका साकारणार आहे लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा गोखले. तब्बल ९ वर्षांनी पूर्वाने वाहिनीवर कमबॅक केलं आहे.
तर, पूर्वा आणि सुबोध भावे या दोघांनी ‘कुलवधू’ या ब्लॉकबस्टर मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यामुळे पूर्वा आणि सुबोधची केमिस्ट्री पुन्हा एकदा ऑनस्क्रीन पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहे.
पूर्वा ग्रीन कलरच्या सुंदर बॉडीकॉन वनपीसमध्ये राजवाडेंच्या घरात एन्ट्री घेते. घरात येताच ती स्वानंदीला म्हणते, “तू आहेस तर सॅमची बायको…” यावर स्वानंदी तिला छान हसत ग्रिट करते आणि विचारते “तुम्ही राजवाडेंच्या मैत्रीण?”
पुढे पूर्वा सांगते, “गर्लफ्रेंड! एकमेव…सॅमला दुसरं कोणीच आवडलं नाही.” यावर स्वानंदी तिची बोलती बंद करत म्हणते, “एक्स ना…त्यांना आधी कोणी आवडलं नव्हतं, आता मी आहे ना? त्यांची बायको! आमचं नातं असं आहे ना की, एखाद्या एक्सला सुद्धा आमच्या हॅप्पीनेसचा हेवाच वाटेल.”
आता राजवाडेंची जुनी मैत्रीण आल्यावर स्वानंदी-समरमध्ये दुरावा येणार की, याउलट दोघांच्या नात्याची ही ‘वीण’ आणखी घट्ट जोडली जाणार हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, हा विशेष भाग प्रेक्षकांना ५ मे रोजी सायंकाळी ७.१५ वाजता ‘झी मराठी’वर पाहायला मिळेल. सध्या ही मालिका पाऊण तास प्रसारित केली जात आहे.
