Zee Marathi Veen Doghantali Hi Tutena Promo : राजवाडेंच्या कंपनीने एक महत्त्वाचं इंटरनॅशनल डील मिळवल्यामुळे समर एका खास पार्टीचं आयोजन करतो. या पार्टीत स्वानंदी पहिल्यांदाच एका वेगळ्या लूकमध्ये सर्वांसमोर एन्ट्री घेणार आहे. ती वेस्टर्न गाऊन घालून पार्टीला येते. पण, याच पार्टीत किमया देखील असणार आहे. काही दिवसांपूर्वीच समरची जवळची मैत्रीण अन् एक्स गर्लफ्रेंड असलेल्या किमयाची या मालिकेत एन्ट्री झाली.
किमया आल्यापासून स्वानंदी प्रचंड Insecure फील करत असते. पूजेला किमयाने थेट समरच्या बाजूला जाऊन बसणं…या गोष्टी स्वानंदीला खूप जास्त खटकलेल्या असतात. आपलं लग्न ही फक्त एक तडजोड आहे, असं स्वानंदीला वाटत असतं पण, तिच्याही नकळत ती समरच्या प्रेमात पडलीये. शेवटी या सगळ्या भावना स्वानंदीच्या ओठांवर येणार आहेत…पण, यावेळी ती शुद्धीत नसेल. याचा जबरदस्त प्रोमो नुकताच ‘झी मराठी’ वाहिनीकडून शेअर करण्यात आला आहे.
स्वानंदीकडून या पार्टीत दारूचं सेवन केलं जाईल. तिचा स्वभाव मुळातच साधा आणि प्रामाणिक असतो. त्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या बायकोला सावरण्यासाठी समर पुढाकार घेतो. तो स्वानंदीला एका ठिकाणी शांत बसून राहा असं सांगत असतो. यानंतर तिला पाणी प्यायला सांगतो. पण, स्वानंदी पाणी प्यायला नकार देते.
पुढे, समर स्वानंदीला विचारतो, “पाणी सुद्धा नकोय…मग मॅडम काय हवंय तुम्हाला?” यावर नायिका म्हणते, “तुम्ही…एक ग्लास समर राजवाडे द्या” आणि इतकं बोलून ती गोड हसु लागते. यानंतर समर तिला, “स्वानंदी मॅडम आता तुम्ही आराम करा” असं सांगतो.
अर्थात स्वानंदीने नकळत दिलेली प्रेमाची कबुली समरपर्यंत पोहोचत नाही. ती दारूच्या नशेत असल्याने समर तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो…असं प्रोमोत पाहून जाणवतंय. हा विशेष भाग १६ मे संध्याकाळी ७:१५ वाजता प्रसारित केला जाईल.
या प्रोमोमध्ये तेजश्री प्रधानचा अभिनय पाहून तिचे सगळे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. “काय मस्त प्रोमो आहे आणि तेजू मॅमची Acting कमाल”, “किती गोड प्रोमो आहे हा…”, “तेजश्री प्रधानसाठी शब्द कमी पडतील इतका सुंदर अभिनय”, “Cute एकदम…तेजश्रीचं तेज कधीच लपणार नाही”, “तेजश्रीचा एक्स्प्रेशन्समध्ये कोणीही हात पकडू शकणार नाही”, “एक्स्प्रेशन्स कमाल…सुपर अभिनय” अशा असंख्य प्रतिक्रिया प्रेक्षकांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.
दरम्यान, आता स्वानंदी आणि समरचं नातं कसं बहरणार की, किमयामुळे गोष्टी आणखी बिघडणार हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
