‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत दिवसेंदिवस अंशुमनचा अरेरावीपणा वाढत जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अंशुमन आणि मल्लिका या दोघांनी समर-आनंदच्या मैत्रीत सुद्धा दुरावा निर्माण केलेला आहे. यानंतर होळीच्या सणाला सुद्धा अंशुमन आजीशी व्यवस्थित बोलत नाही. तिचा अपमान करतो, आजीने सांगितलेलं कोणतंच काम ऐकत नाही. यामुळे स्वानंदी त्याला सगळ्यांसमोर जाब विचारते.
आता अंशुमनचे हे सगळे कारनामे समरपर्यंत पोहोचल्यावर तो काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण, समरने अंशुमनच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्याआधीच स्वानंदी त्याला चांगलीच अद्दल घडवणार आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत स्वानंदी ही भूमिका लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारत आहे. मालिकेत आता अंशुमनच्या चुकांचा घडा भरला असून, यानिमित्ताने प्रेक्षकांना पहिल्यांदाच स्वानंदीचा रुद्रावतार पाहायला मिळेल. अंशुमन राजवाडेंच्या घरात मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेवर हात उगारतो. “तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस” असा आरोप तो या महिलेवर करतो.
अंशुमन आपल्या डोळ्यासमोर एका महिलेला असा त्रास देतोय हे स्वानंदीला अजिबात सहन होत नाही. ती म्हणते, “तुझी हिंमत कशी झाली अंशुमन? एका मुलीवर हात उगारताना लाज नाही वाटली?” इतक्यात समरही तिथे येतो आणि अंशुमनला सांगतो, “आता तुला साधी नाही मोठी शिक्षा झाली पाहिजे”
यानंतर स्वानंदी पदर खोचते आणि त्याच चाबकाने अंशुमनला झोडून काढते. स्वानंदी त्याला म्हणते, “ज्या दिवशी आमची सहनशक्ती संपते…त्यादिवशी तुझ्यासारखा पुरुष सुद्धा काहीच करू शकत नाही.” मल्लिका काकू आणि अर्पिता या दोघी सुद्धा स्वानंदीचं हे रुप पाहून घाबरतात.
या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मस्त स्वानंदी आता पुढचा नंबर त्या मायलेकींचा आहे”, “त्या मल्लिकाला सुद्धा असंच चोपून काढा”, “वाह मजाच आली”, “बाई म्हणजे दुर्गेचा अवतार”, “एक नारी सबपे भारी…जबरदस्त प्रोमो आहे”, “त्या अर्पिता आणि मल्लिकाला सुद्धा मारा”, “एक नंबर स्वानंदी”, “खूप मजा येणार” हा एपिसोड पाहायला अशा असंख्य कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहेत. हा एपिसोड ९ मार्चला सायंकाळी ७:३० वाजता झी मराठीवर प्रसारित केला जाईल.
