Zee Marathi Veen Doghantali Hi Tutena Serial Promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत स्वानंदीने नुकतंच अंशुमनचं खरं रूप सर्वांसमोर उघड केलं आहे. यामुळे स्वानंदीबद्दल थोडा का होईना समरच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. इतके दिवस स्वानंदीला तोंडावर पाडण्यासाठी मल्लिका विविध कटकारस्थानं करत होती. रोहन-अधिराचा घटस्फोट घडवून आणण्यासाठी सुद्धा राजवाडे कुटुंबीयांनी अनेक प्रयत्न केले. पण, अंशुमनची चूक सर्वांसमोर उघड झाल्याने आजी त्याला श्वेताची माफी मागण्यास सांगते आणि आता खऱ्या अर्थाने मल्लिकाचा क्रूर डाव फसणार आहे.
स्वानंदी विरोधात मालिकेत एकामागून एक कारस्थानं सुरू होती. स्वानंदी सुद्धा मल्लिकाच्या जाळ्यात अगदी सहजपणे अडकली जात होती. यामुळे तिच्या अन् समरच्या नात्यात दुरावा निर्माण होत होता. हे दोघंही एकमेकांचा तिरस्कार करू लागले होते. पण, आता समर-स्वानंदीच्या नात्याला मैत्रीचं नाव मिळणार आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत लवकरच समर-स्वानंदी त्यांचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत. यासाठी हार्टशेप केक, कँडेल लाइट डिनर, सुंदर सजावट असा प्लॅन तयार केलेला असतो. अर्थात या दोघांमध्ये साधी मैत्रीही नसते त्यामुळे हा प्लॅन वाचून समर अस्वस्थ होतो. इतकंच नव्हे तर या दोघांसाठी व्हॅलेंटाईन डेनिमित्त सुंदर अशी सजावट केलेली असते. तिथे पोहोचल्यावर दोघंही अस्वस्थ होतात. समर म्हणतो, “मला हे सेलिब्रेशन वगैरे असलं काहीच जमणार नाहीये.” पुढे स्वानंदी त्याला सांगते, “मलाही हे जमणार नाहीये… आता या सगळ्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही माझ्याशी मैत्री करू शकता का?” अशी ऑफर देत स्वानंदी समरसमोर मैत्रीचा हात पुढे करते.
समर सुद्धा लगेच स्वानंदीची ही ऑफर स्वीकारतो आणि तिला ‘चालेल’ असं सांगतो. आता या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने समर-स्वानंदीच्या प्रेमाची नव्हे तर मैत्रीची सुरुवात होणार आहे. पुढच्या २८ दिवसांत हे नवीन आणि अनोखं वळण प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळेल.
दरम्यान, तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका रोज सायंकाळी साडेसात वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित केली जाते.

