Veen Doghantali Hi Tutena Promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सध्या स्वानंदी अन् समरचं प्रेम बहरत असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वानंदीचा खरेपणा, तिचा स्वभाव, ज्याप्रकारे आपली बायको राजवाडेंचं संपूर्ण घर सांभाळतेय, प्रत्येकाला समजून घेतेय या गोष्टी समरला भावतात. याशिवाय अंशुमनचा खरा चेहरा सुद्धा त्याच्यासमोर उघड झालाय. त्यामुळे समरच्या आयुष्यात आता स्वानंदी खूप जास्त महत्त्वाची झालीये. बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. अशातच स्वानंदी समरकडे एक गोड इच्छा व्यक्त करते, आता बायकोच्या प्रेमापोटी समरने स्वत:चा पूर्ण लूक बदलला आहे.

स्वानंदी समरला म्हणते, “या मिशीची काहीच गरज नाहीये तुम्हाला…मिशीमध्ये तुम्ही छानच दिसता पण, मिशीशिवाय जरा जास्त छान वाटाल” आता स्वानंदीने सांगितल्यावर समरने सुद्धा तिची ही इच्छा पूर्ण केलीये. समर Clean Shave लूकमध्ये मिशी काढून तिच्यासमोर एन्ट्री घेतो. त्याला या नव्या रुपात पाहून स्वानंदी प्रचंड खूश होते. ती म्हणते, “फक्त मी सांगितलं म्हणून तुम्ही मिशी काढून टाकलीत” यानंतर स्वानंदी समरचे गाल ओढते आणि त्याला ‘आय लव्ह यू’ म्हणत प्रेम व्यक्त करते. या दोघांचा हा Cute व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याशिवाय ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या आणखी एका प्रोमोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये समर स्वानंदीला त्याच्या कंपनीत नोकरी करण्यासाठी ऑफर देणार आहे. समर संपूर्ण दिवस कामात व्यग्र असतो…स्वानंदीचा फोन उचलण्यासाठीही त्याला वेळ नसतो. यादरम्यान, समरचं डोकं दुखत असल्याने तो खुर्चीला टेकून डोळे बंद करून बसलेला असतो. इतक्यात स्वानंदी मागून येते आणि समरचं डोकं दाबून देते. समरला कामाच्या व्यापात जेवणासाठीही वेळ मिळत नाही.

शेवटी स्वानंदी आनंदला समरने दिलेल्या नोकरीच्या ऑफरबाबत सांगते. यावर आनंद तिला, नीट विचार करून निर्णय घे असा सल्ला देतो. आता ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्वानंदी खरंच मिस्टर राजवाडेंच्या कंपनीत रुजू होणार की, आहे त्याच कंपनीतच काम करणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा हा विशेष भाग २८ ऑगस्टला प्रसारित केला जाईल. स्वानंदी-समरची भन्नाट केमिस्ट्री आता प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे.