Zee Marathi Veen Doghantali Hi Tutena Promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत असा एक क्षण प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे, ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी राजवाडेंच्या घरी स्वानंदीचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला जातो. पण, या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान मल्लिका एक विचित्र प्लॅन बनवते. आनंद आणि निकिता या दोघांवर चोरीचा आळ घेतला जातो.

मल्लिका जाणूनबुजून महागडा हार निकिताच्या पर्समध्ये ठेवते आणि संपूर्ण पार्टीत निकिता-आनंदने चोरी केल्याचं भासवलं जातं. खरंतर या दोघांची समरबरोबर २० वर्षांपासूनची मैत्री असते. पण, समरने दाखवलेल्या अविश्वासामुळे एका क्षणात ही मैत्री तुटते.

यापूर्वी मल्लिकाने अनेकदा आमिष दाखवून सुद्धा आनंद तिच्या कोणत्याच जाळ्यात अडकला जात नाही. तो समरशी कधीच खोटेपणाने वागत नाही. ज्या समरसाठी आपण सगळं काही केलं…त्याच मित्राने सर्वांसमोर आपल्यावर अविश्वास दाखवला यामुळे आनंद प्रचंड दुखावतो. तो आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा करतो. पण, या सगळ्यात स्वानंदी त्याची समजून काढते. जोपर्यंत आनंद-निकिताला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत स्वानंदी शांत बसणार नसते.

Award Banner

स्वानंदीचा आनंद-निकितावर पूर्ण विश्वास असतो आणि तिचा हाच विश्वास आता खरा ठरणार आहे. ज्या बाईने निकिताच्या बॅगेत हार ठेवला…ते रेकॉर्डिंग स्वानंदी सगळ्या राजवाडे कुटुंबीयांसमोर प्ले करून दाखवते. हा व्हिडीओ पाहून समरचे डोळे भरून येतात. आपण आपल्या मित्रांवर अविश्वास दाखवला याची पुरेपूर जाणीव त्याला होते.

समर मनात विचार करतो, “या सगळ्यात आनंद-निकिताचा काहीही दोष नव्हता.” यानंतर समर सायकलवरूनच भर पावसात आनंदच्या घराखाली पोहोचतो आणि त्याला अश्रू अनावर होतात. समर हतबल होऊन आनंदची माफी मागत असतो. “आनंद प्लीज ये खाली…बोल माझ्याशी, मला भेट. मला माहितीये आनंद मी खूप मोठी चूक केलीये. आज ती चूक सुधारायलाच मी इथे आलोय. मी दोषी आहे…मला माफ कर…प्लीज खाली ये!” आता आनंद समरला माफ करेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, या प्रोमोवर नेटरकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “आला बाबा शेवटी प्रोमो”, “स्वानंदीमुळे हे सगळं उघड झालं”, “फक्त स्वानंदीमुळे आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहिकडे”, “समर आणि आनंदची इतक्या वर्षाची घट्ट गोड मैत्री परत पहायला मिळणार”, “मस्तच पण या सगळ्यात काकू अंशुमन आणि अर्पिता सुद्धा एक्सपोज झाले पाहिजेत”, “समर सर वाह काय अभिनय केलाय…सुंदर मैत्री असावी तर अशी”, “मस्त प्रोमो किती दिवस वाट पाहत होतो” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा हा विशेष भाग २३ आणि २४ मार्चला संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीवर प्रसारित केा जाईल.