Zee Marathi Veen Doghantali Hi Tutena Promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत आता लवकरच समर आणि आनंदमध्ये झालेले गैरसमज दूर होणार आहेत. मल्लिकाने रचलेल्या षडयंत्रामुळे आनंद आणि निकितावर भर पार्टीचा चोरीचा आळ घेतला जातो. मल्लिकाने आधीच कान भरल्यामुळे २० वर्षांची मैत्री विसरून समर आनंदवर अविश्वास दाखवतो. पण, या सगळ्यात स्वानंदी आनंदच्या पाठिशी अगदी ठामपणे उभी राहते. आनंद आणि निकिताला ती सत्य परिस्थिती सांगते. आता स्वानंदीमुळेच आनंद निर्दोष असल्याचं सत्य समरसमोर उघड झालेलं आहे. यानंतर समर आपल्या जिवलग मित्राची माफी मागतो. आनंद-समरचं नातं हळुहळू पूर्ववत होईलच. पण, या सगळ्यात मालिकेत एक गोड ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे आता समर-स्वानंदीच्या मैत्रीची गोड सुरुवात होईल.
स्वानंदीवर आपण कायम अविश्वास दाखवतो याची जाणीव कुठेतरी समरला होईल. यानंतर समर आपल्या सासरेबुवांसाठी एक खास प्लॅनिंग करणार आहे. स्वानंदीचे बाबा दिलीप सरपोतदार सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेते महेश काळे यांचे खूप मोठे फॅन आहेत.
खास सासरेबुवांसाठी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी समर महेश काळेंच्या कार्यक्रमाचं आयोजन करेल. समरचा सुरेल नजराणा स्वानंदीचं मन जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
समर स्वानंदीला फोन करतो आणि म्हणतो, “एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तुम्ही एक काम करा… बाबांबरोबर मी जो पत्ता पाठवतोय तिथे या! समरने फोन केल्यावर स्वानंदी जरा काळजीत पडते पण, यानंतर ताबडतोब रिक्षा पकडून ती संबंधित ठिकाणी पोहोचते.
खरंतर समरने स्वानंदी आणि तिच्या बाबांना ज्या पत्त्यावर बोलावलं असतं…तो पत्ता असतो एका आलिशान हॉटेलचा. याठिकाणी प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे गाणं सादर करणार असतात. महेश काळेंना प्रत्यक्ष पाहून स्वानंदीचे बाबा प्रचंड खूश होतात. अनेक वर्षांची इच्छा अखेर पूर्ण झाली या विचाराने त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
आपल्या नवऱ्याने बाबांसाठी इतकं छान सगळं प्लॅन केलंय हे पाहून स्वानंदी अगदी भारावून जाते. कार्यक्रम संपल्यावर महेश काळे म्हणतात, “वहिनी समरसारखा नवरा तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही.”
या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “किती गोड प्रोमो आहे”, “इथून खरी स्वानंदी-समरच्या नात्याला सुरुवात होईल”, “खूपच पॉझिटिव्ह प्रोमो आहे छान वाटलं”, “मस्त ट्विस्ट आहे”, “समरने कमाल केली” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
दरम्यान, आता समरने सासरेबुवांना दिलेला हा सुरेल नजराणा स्वानंदीचं मन जिंकणार का? हे मालिकेत लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, हा विशेष भाग ३० मार्चला सायंकाळी ७:३० वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित केला जाईल.
