Veen Doghantali Hi Tutena Samar-Swanandi Promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत सध्या प्रेक्षकांना समर-स्वानंदीची गोड केमिस्ट्री पाहायला मिळतेय. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिली होती. यानंतर मल्लिका काकू, अंशुमन, अर्पिता या सगळ्यांनी स्वानंदी-समरच्या आयुष्यात अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, मिस्टर अँड मिसेस राजवाडेंचं बॉण्डिंग दिवसेंदिवस आणखी घट्ट झालं. आता येत्या भागात समर आपल्या लाडक्या बायकोला सरप्राइज देताना दिसणार आहे.

स्वानंदीला सरप्राइज देण्यासाठी समर घरच्या घरी खास प्लॅनिंग करणार आहे. सुंदर दिवे, शोभेची फुलं, Tent अन् चारही बाजूला रोषणाई असा सगळा सेटअप करून समर बायकोला गोड सरप्राइज देतो. याठिकाणी ‘वेलकम टू समर कॅफे’ अशी पाटी लावलेली असते.

स्वानंदी मिस्टर राजवाडेंचं हे गोड सरप्राइज पाहून भारावून जाते. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. पहिल्यांदाच एका वेगळ्या लूकमध्ये ती समर राजवाडेंसमोर एन्ट्री घेते. गुलाबी रंगाच्या लाँग वनपीसमध्ये स्वानंदी खूपच गोड दिसतेय.

समरसमोर आपल्या भावना व्यक्त करताना ती म्हणते, “My God…तुम्ही किती छान प्लॅनिंग केलं आहे, हे किती गोड सरप्राइज आहे. अशी स्वप्न पाहण्याची सुद्धा मी हिंमत केली नव्हती. पण, बघा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि सगळं काही बदलून गेलं. माझं आयुष्य, माझं नशीब सगळं काही तुम्ही बदलून टाकलंत. माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे” यावेळी स्वानंदीचे डोळे पाणावतात.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या या सुंदर प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “समर-स्वानंदी लव्ह यू”, “किती गोड प्रोमो आहे हा”, “आम्हाला पण समर कॅफेमध्ये यायचं आहे”, “किती सुंदर सरप्राइज प्लॅन केलंय”, “वॉव समर-स्वानंदी”, “यांची केमिस्ट्री खरंच भारीये” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका सायंकाळी ७:३० वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.