Zee Marathi Veen Doghantali Hi Tutena Serial Samar Swanandi : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेची टीम नेहमीच विविध प्रयोग करत असते. नुकताच या मालिकेचा संवाद विरहित स्पेशल भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. या भागाचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात आलं, या पाठोपाठ आता मालिकेत आणखी काहीतरी खास घडणार आहे. आपल्या लाडक्या बायकोला मिस्टर राजवाडे डेटवर घेऊन जाणार आहेत.

आता डेट म्हटलं की, अनेकांना रोमँटिक डिनर डेट, मुव्ही डेट असं काहीतरी वाटलं असेल. पण, मिस्टर अँड मिसेस राजवाडे लवकरच नाटक पाहण्यासाठी एकत्र जाणार आहेत. याचा खास प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात समर-स्वानंदी ‘लग्नपंचमी’ नाटक पाहण्यासाठी जाणार आहेत.

‘लग्नपंचमी’ हे नाटक पाहत असताना, अनेक रोमँटिक सीनमध्ये समर मुख्य कलाकारांच्या जागी स्वत:ला आणि स्वानंदीला इमॅजिन करत असतो. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेची लेखिका मधुगंधा कुलकर्णी हिच ‘लग्नपंचमी’ नाटकाची सुद्धा लेखिका आहे. यामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी या नाटकात अभिनेत्री अमृता खानविलकर झळकत होती. पण, व्यग्र शेड्युलमुळे अमृताने नाटकातून एक्झिट घेतली आणि तिच्याऐवजी आता विदुला या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहे.

ज्यावेळी समर आपलं नाटक पाहायला आलाय ही गोष्ट स्वप्नील जोशीला समजते तेव्हा तो प्रचंड आनंदी होतो आणि मिस्टर अँड मिसेस राजवाडेंना भेटायला बोलावतो. स्वप्नील जोशीला प्रत्यक्ष पाहून स्वानंदी प्रचंड खुश होते. ती सुद्धा समरबरोबर नाटकातील सर्व कलाकारांना भेटते. यामुळे आता समर-स्वानंदीचं बॉण्डिंग आणखी घट्ट होणार आहे.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “मस्त प्रोमो…कारस्थापेक्षा हे बरंय”, “Cutest डेट”, “लेखकांनी एक वेगळंच वळण घेतल्याबद्दल धन्यवाद”, “या निमित्ताने नाटकांचंही प्रमोशन झालं मस्तच”, “फायनली पॉझिटिव्ह Vibes”, “कमाल डेट”, “लेखकांचे आभार खऱ्या अर्थाने समर-स्वानंदीला फोकस ठेवून मालिका लिहिताय मस्त” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा हा विशेष भाग ४ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता प्रसारित केला जाईल.