Veen Doghantali Hi Tutena Promo : समरने स्वानंदीच्या बाबांना वाढदिवसानिमित्त खास Surprise दिल्याचं ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळालं. समर सासरेबुवांसाठी खास महेश काळेंच्या कार्यक्रमाचं आयोजन करतो. समर ज्या पद्धतीने सगळं प्लॅन करतो, ते पाहून स्वानंदी सुद्धा भारावून जाते. तिच्या मनात समरविषयीचा आदर वाढतो. आता आपण सुद्धा समरला काहीतरी छान सरप्राइज दिलं पाहिजे असं तिला वाटतं. यासाठी ती आनंद-निकिताची मदत घेते.

स्वानंदी ठरल्याप्रमाणे समरची आवडनिवड जाणून घेण्यासाठी आनंद-निकिताला भेटते. राजवाडेंना नेमकं काय आवडतं? कोणती गोष्ट केल्याने समरला खूप जास्त आनंद होईल याचा विचार स्वानंदी करत असते. निकिता आणि आनंद तिला वेगवेगळे पर्याय सुचवत असतात. अशातच निकिता तिला समरला बोटिंग करायला आवडतं असं सांगते.

निकिताने दिलेली कल्पना स्वानंदीला सुद्धा खूप आवडते. ती लगेच समरला फोन करते. पण, समर “आता मला प्रचंड काम आहे” असं सांगून स्वानंदीचा फोन कट करतो. यामुळे स्वानंदीची सुद्धा चिडचिड होते. यानंतर या सगळ्यातून आनंद-निकिता मार्ग काढतात. आनंद ऑफिसमध्ये जातो आणि समरला खोटं सांगतो. “स्वानंदी वहिनी कुठेतरी अडकल्या आहेत…तू ताबडतोब जा” असं तो घाईगडबडीत समरला सांगतो.

Award Banner

आता स्वानंदी कुठेतरी अडकलीये हे ऐकून समर सगळं काम ठेवून तिला भेटण्यासाठी जातो. तलावाकडे पोहोचल्यावर स्वानंदी त्याला सगळं नीट समजावून सांगते. मुळात ती जागा पाहून समर प्रचंड भावुक होतो. त्यानंतर दोघंही बोटिंग करायला जातात. “बाबा गेल्यावर अनेक वर्षांनी मी इथे आलोय…आणि अशा बोटीत बसतोय” समर पहिल्यांदाच बायकोसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. शेवटी ती नवऱ्याचे डोळे पुसते आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते.

स्वानंदीचं सरप्राइज पाहून समर प्रचंड भावनिक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रोमोच्या शेवटी समर-स्वानंदीने एकमेकांना मिठी मारल्याचं पाहायला मिळत आहे पण, हे स्वप्न असू शकतं असा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे.

“बाकीचं ठिके पण तो शेवटचा सीन स्वप्न असणार”, “प्लीज आम्हाला एप्रिल फूल बनवू नका”, “हे फक्त स्वप्न नसूदेत हे खरं होऊदेत…”, “निकिता किंवा आनंदला तो शेवटचा सीन स्वप्नात दिसला असेल इतका रोमँटिक समर होणार नाही…मला हे खरं वाटत नाही” अशा बऱ्याच प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा हा विशेष भाग ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित केला जाईल. आता प्रोमोमध्ये दाखवलेला शेवटचा सीन स्वप्न असेल की सत्य ते एपिसोड ऑन एअर झाल्यावर स्पष्ट होईल.