Veen Doghantali Hi Tutena : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत अंशुमनने स्वानंदीच्या बहिणीशी म्हणजेच सुश्मिताशी अचानक लग्न केल्याचं पाहायला मिळालं. खरंतर, या लग्नामुळे चिंगीवर मोठा अन्याय होतो पण, स्वत:च्याच आईने विश्वासघात करून अंशुमन-सुश्मिताचं लग्न लावल्यामुळे स्वानंदी भयंकर संतापते. अधिरा-रोहन सुद्धा मंदाकिनीवर चिडतात. अंशुमन चांगला मुलगा नाहीये त्याच्यामुळे सुश्मिताच्या आयुष्याची वाट लागेल याची पूर्ण कल्पना स्वानंदीला असते. पण, मंदाकिनीने पैशांच्या हव्यासापोटी हा निर्णय घेतलेला असतो.
सुश्मिताने राजवाडेंची धाकटी सून आणि अंशुमनची पत्नी म्हणून गृहप्रवेश केल्यावर समर-स्वानंदीसमोर एक मोठी मागणी केली आहे. खरंतर, अंशुमन-सुश्मिताच्या लग्नाबद्दल फार कोणालाच काहीही माहीत नसतं. त्यामुळे सुश्मिता लग्नाची घोषणा करण्यासाठी पार्टीचं आयोजन करा असं राजवाडेंना सांगते. राजवाडेंची धाकटी सून कोण आहे हे या पार्टीत रिव्हिल होणार असतं, त्यामुळे स्वानंदी बहिणीला सुंदर पैठणी साडी नेसायला देते. पण, ऐनवेळी अंशुमन साडीची पिशवी बदलतो आणि सुश्मिता वनपीस घालून पार्टीला येते. यामुळे तिचाच हशा होतो.
स्वानंदीने मुद्दाम बहिणीला साडीऐवजी शॉर्ट वनपीस ड्रेस घालायला दिला, तिला बहिणीचं चांगलं बघवत नाही…शेवटी तिने सावत्रपणा दाखवला असे गंभीर आरोप मंदाकिनी स्वानंदीवर करते. पण, संपूर्ण पार्टीत समर ठामपणे आपल्या बायकोची बाजू घेतो आणि सर्वांची बोलती बंद करतो.
पण, आता मल्लिका स्वानंदीच्या हातून राजवाडेंच्या घरातील सगळे हक्क, अधिकार काढून घेण्यासाठी एक महत्त्वाचा प्लॅन बनवतेय. घरात सत्यनारायणाची पूजा पार पडल्यावर सुश्मिता समरकडे एक गिफ्ट मागते. ती म्हणते, “मला या घरात माझी हक्काची जागा हवीये, जी मला मिळत नाहीये. मला या घरातले अधिकार हवेत…आणि तेच माझं गिफ्ट असेल.”
सुश्मिताचा हा भलताच रुबाब पाहून समर-स्वानंदी नि:शब्द होतात. दोघंही काहीही न बोलता सुश्मिताच्या हातात राजवाडेंच्या घराच्या किल्ल्या सुपूर्द करतात. आता घराचा कारभार सुश्मिताच्या हातात जाणार आहे. आता सुश्मिता राजवाडेंचं घर सांभाळणार की, सगळी घडी विस्कटणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा हा विशेष भाग २५ जूनला सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित केला जाईल.
