Veen Doghantali Hi Tutena Promo : ‘वीण दोघांतही ही तुटेना’ या मालिकेत नुकताच एक भन्नाट ट्विस्ट पाहायला मिळाला. चिंगी गरोदर असल्याने बाळाची जबाबदारी स्वीकारून अंशुमनने तिच्याशी लग्न करावं असा स्वानंदीचा आग्रह असतो. पण, प्रत्यक्षात मल्लिका मोठा डाव खेळते. मंदाकिनीला पैशांचं आमिष दाखवून ती अंशुमन आणि सुश्मिताचं लग्न लावून देते.
अंशुमनने आजवर अनेक स्त्रियांना फसवलेलं आहे. त्यामुळे अशा पुरुषाशी आपल्या बहिणीचं लग्न होणं हा स्वानंदीसाठी खूप मोठा धक्का असतो. याशिवाय अंशुमन-सुष्मिताचं लग्न होणं हा चिंगीवर सुद्धा खूप मोठा अन्याय असतो. हे सगळं समरला समजल्यावर तो प्रचंड संतापतो. अंशुमनला तो या सगळ्याचा जाब विचारतो.
अंशुमनला त्याने केलेल्या कोणत्याही कृत्याचा पश्चाताप नाहीये. याशिवाय अर्पिता सुद्धा अंशुमनच्या सगळ्या चुका पोटात घालून तो किती चांगला आहे, हे समरला सांगत असते. ती स्वानंदीचाही अपमान करते. ज्या क्षणाला अर्पिता स्वानंदीला उलटसुलट बोलते, तिथेच समरचा संयम सुटतो. तो अर्पिताची चांगलीच शाळा घेतो. आता सगळं सामान गुंडाळून आपल्या सासरी परत जायचं असं सांगत, समर राजवाडे अर्पिताला घराबाहेर हाकलून देतो.
अर्पिता घराबाहेर गेली असली तरी, आता तुझ्या डोक्यावर तुझीच बहीण बसणार असा इशारा मल्लिका स्वानंदीला देते. यानंतर मल्लिका सुष्मिताचेही कान भरते. सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे सुष्मिता राजवाडेंकडे एक अजब मागणी करणार आहे.
सुष्मिता सगळ्या राजवाडेंना घरात एकत्र जमायला सांगते आणि म्हणते, “मला तुमच्याशी जरा बोलायचंय…माझं आणि अंशुमनचं लग्न तुम्ही अंधारात ठेवलंय. मला आमच्या लग्नाचं रिसेप्शन हवंय. जर तुम्ही ग्रँड रिसेप्शन केलं नाहीत तर, मी काहीच खाणार नाही…खाणं-पिणं सोडून देईन.” अशी धमकी ती स्वानंदी अन् समरला देते.
आता बहिणीची ही अजब मागणी स्वानंदी पूर्ण होऊ देईल का? हे ‘वीण दोघांतही ही तुटेना’ मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. ही मालिका सायंकाळी ७:३० वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.
