‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सुरुवातीला स्वानंदी अन् समर एकमेकांचा तिरस्कार करताना दिसायचे. पण, आता या दोघांमध्ये छान मैत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. अंशुमनचा खोटेपणा जेव्हापासून स्वानंदीने समरसमोर उघड केलाय, तेव्हापासून समर स्वानंदीशी प्रेमाने वागतोय. तिची प्रत्येक गोष्ट ऐकून घेतोय. इतकंच नव्हे तर आनंद आणि समर यांच्या मैत्रीत आलेला दुरावा सुद्धा स्वानंदीने मध्यस्थी केल्यामुळे मिटला आहे.

या सगळ्या घडामोडींमुळे स्वानंदी-समर आता एकमेकांशी चांगले बोलू लागले आहेत, ते दोघंही नेहमी एकमेकांची मदत करताना दिसतात. पण, या सगळ्या गोष्टी आता मल्लिकाला खटकत आहे. काही करून स्वानंदीला समरपासून दूर केलं पाहिजे…यामुळे ती समरचे कान भरण्याचा, त्याला नकळत त्रास देण्याचा एकही मार्ग सोडत नाहीये. पण, निकिता-आनंदमुळे स्वानंदी-समरच्या नात्यातील विश्वास आता आणखी घट्ट होत चालला आहे.

स्वानंदी आता पूर्णपणे बायकोच्या हक्काने समरवर दादागिरी करताना दिसणार आहे. ऑफिसमध्ये अचानक समरची प्रकृती बिघडते, त्यामुळे निकिता आणि आनंद हे दोघंही समरला डॉक्टरकडे घेऊन जातात. यावेळी समरचं ब्लड प्रेशर शूट झाल्याचं डॉक्टर आनंदला सांगतात. समरने नकार देऊनही आनंद या सगळ्या गोष्टी स्वानंदीच्या कानावर घालतो.

Award Banner

नवऱ्याची प्रकृती बिघडल्याचं समजताच स्वानंदी सुद्धा लगेच रुग्णालयात पोहोचते. समरला पाहिल्यावर ती एकामागून एक प्रश्नांचा भडीमार सुरू करते. स्वानंदी खूपच हायपर होते आणि समरला विचारते, “असं कसं तुमचा बीपी शूट झाला?, सगळ्यात आधी मला सांगा तुम्हाला नेमका कधीपासून त्रास होतोय?, बाकी रिपोर्ट्स, टेस्ट करायच्या आहेत का?, एक काम करा पूर्ण बॉडी चेकअपच करून टाका…, आता काय त्रास होतोय?”

स्वानंदीचे प्रश्न ऐकून समरला सुद्धा नेमकं काय बोलावं हे कळत नाही. शेवटी डॉक्टर समरला सांगतात, “त्यांचा बीपी आता नॉर्मल झालाय.” यानंतर आनंद आणि निकिता हसु लागतात. आनंद यावेळी समरची फिरकी घेत म्हणतो, “बायको आल्यावर आता लगेच बरा झालास”

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “स्वानंदी फुल बायको मोड”, “आता मजा येतेय ही मालिका पाहायला”, “स्वानंदी नेहमी मिस्टर राजवाडेंची काळजी घेते” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत. हा विशेष भाग प्रेक्षकांना ८ एप्रिलला सायंकाळी साडेसात वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.