Veen Doghantali Hi Tutena Promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत काही दिवसांपूर्वी स्वानंदी मंगळागौर पार पडली पण, या कार्यक्रमात मल्लिका काकूचा मोठा डाव यशस्वी झाला. स्वानंदी ३५ वर्षांची झालीये, आता तिला मूल कसं होईल असं म्हणत काही बायका तिला टोमणे मारतात. यामुळे स्वानंदी प्रचंड अस्वस्थ होते. तिच्या मनातली घालमेल ती काही प्रमाणात समरला सांगते. पण, तिच्या मनाची अवस्था अजूनही समरला पूर्णपणे समजलेली नाहीये.
सध्या समर-स्वानंदी अष्टविनायक यात्रेला गेले आहेत. यावेळी या जोडप्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी खास प्रभाकर मोरे मालिकेत गाऱ्हाणं घालण्यासाठी एन्ट्री घेणार आहेत. समर-स्वानंदी अष्टविनायक यात्रेदरम्यान, ओझरच्या विघ्नेश्वराचं दर्शन घेतात. यावेळी त्यांची भेट प्रभाकर मोरेंशी होते. ते खास राजवाडे कुटुंबीयांसाठी बाप्पासमोर गाऱ्हाणं घालणार आहेत.
प्रभाकर मोरे म्हणतात, “हे देवा गणराया, गजानना…आज राजवाडे कुटुंब तुमच्या दर्शनासाठी आलेलं आहे. त्यांच्या पाठिशी असाच उभा राहा रे महाराजा!”
यावर समर-स्वानंदी म्हणतात, “होय महाराजा…”
प्रभाकर मोरे देवाला पुढे सांगतात, “आणि सगळ्यात महत्त्वाचं घराचं गोकुळ होऊ दे रे महाराजा…” यानंतर मात्र, समर-स्वानंदीचा चेहरा काहीसा उतरतो. तिला मंगळागौरीच्या कार्यक्रमात बायकांनी मारलेले टोमणे आठवू लागतात. “अगं अजून मुलाचं मनावर का नाही घेतलंस? पस्तीशी उलटल्यावर मुलं कशी होतील?”
स्वानंदी बाप्पाचा आशीर्वाद घेताना मनातच विचार करते, “राजवाडेंच्या घराचं गोकुळ व्हावं अशी माझीही इच्छा आहे पण, यात माझ्यामुळेच अडथळा निर्माण होणार नाही ना?” तिच्या मनात अनेक प्रश्न असतात. आता या सगळ्या भावना ती समरला सांगेल का? स्वानंदीची इच्छापूर्ती होईल का? याचा उलगडा आगामी भागात होईल. हा विशेष भाग २५ सप्टेंबरला सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित केला जाईल.
नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “गेल्या काही दिवसांपासून समर-स्वानंदीचे हे गोड सीन्स पाहून खरंच छान वाटतंय”, “जय देवा महाराजा…. यांच्या मनातले सगळे होऊ दे रे महाराजा”, “नक्कीच स्वानंदीची इच्छा पूर्ण होईल…मस्त जोडी”, “प्रभाकर मोरे यांना पाहून छान वाटले…”, “आमची फेव्हरेट जोडी” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
