Veen Doghantali Hi Tutena Promo Updates : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत लवकरच एका मोठा खुलासा होणार आहे. राजवाडेंच्या घरात सध्या अंशुमनच्या लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. राजवाडेंच्या स्टेटसला आणि अंशुमनला शोभेल अशी श्रीमंत मुलगी सून म्हणून घरी आणायची असं मल्लिकाने ठरवलेलं असतं. पण, अंशुमन आपल्याच आईला तोंडावर पाडणार आहे. चिंगीच्या पोटात अंशुमनचं बाळ असतं आणि हे सत्य आता स्वानंदीला समजणार आहे.
चिंगी गरोदर असल्याची शंका स्वानंदीला येते आणि त्यानंतर स्वानंदीला चिंगीचे मेडिकल रिपोर्ट्स सापडतात. ती अंशुमनपासून गरोदर असल्याचं समजताच स्वानंदीला खूप मोठा धक्का बसतो. चिंगी गरोदर असताना अंशुमनचं वेगळ्याच मुलीशी लग्न होणं ही गोष्ट स्वानंदीला सहन होणारी नसते. आता काहीही करून आपण चिंगीला न्याय मिळवून द्यायचा असा निश्चय स्वानंदी करते.
रडत असलेल्या चिंगीचा हात धरून स्वानंदी तिला लग्नमंडपात नेते. समोर थाटामाटात सुरू असलेला अंशुमनचा लग्नसोहळा स्वानंदी थांबवते आणि मिस्टर राजवाडेंना सुद्धा याबाबतीत तुम्ही भावाची जराही बाजू घेऊ नका असं बजावते.
ज्यावेळी चिंगी गरोदर असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड होतं, त्यावेळी राजवाडे कुटुंबातल्या प्रत्येकाला धक्का बसतो. स्वानंदी रागाच्या भरात अंशुमनला सणसणीत कानाखाली मारते. यानंतर समर सुद्धा त्याला जाब विचारणार आहे.
समर आता अंशुमनला शेवटची संधी देणार आहे….अन्यथा अंशुमनला घराबाहेर काढलं जाईल. समर म्हणतो, “तुला आता मी शेवटची संधी देतोय अंशुमन…आता तू माझ्याशी खरं बोललास ना…तर निदान मी तुझ्याशी माणूस म्हणून नीट वागेन. पण, जर तू ही जबाबदारी नाकारलीस आणि DNA टेस्टमध्ये हे मूल तुझंच असल्याचं सिद्ध झालं…तर मग विषय संपला! या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. यापुढे तुझं कोणाशीही कुठलंच नातं नसेल.”
आता समर भडकल्यावर अंशुमन काय निर्णय घेणार? बाळाची जबाबदारी स्वीकारणार की DNA टेस्टला तयार होणार? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
या प्रोमोवर प्रेक्षकांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. अनेकांना हे प्रकरण DNA टेस्टपर्यंत जाऊन पोहोचणार आणि शेवटी काकू हे रिपोर्ट्स बदलणार असं वाटतंय. तर काही नेटकऱ्यांनी फायनली राजवाडे फर्मली बोलले असं म्हणत समरचं कौतुक केलं आहे. आता अंशुमन काय निर्णय घेणार, भावासमोर तो चूक झाल्याचं मान्य करेल की, अंशुमन कपटीपणा करून DNA रिपोर्ट्स बदलणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका सायंकाळी ७:१५ ते ८ अशी ४५ मिनिटं प्रसारित केली जात आहे. आता १५ जूनपासून ही मालिका पुन्हा एकदा संध्याकाळी साडेसात वाजता ऑन एअर होईल.
