Veen Doghantali Hi Tutena Team : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतील सगळ्या कलाकारांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग सुद्धा तेवढंच छान आहे. काही दिवसांपूर्वीच या टीमने एकत्र येऊन तेजश्री प्रधान आणि किशोरी अंबिये यांचा वाढदिवस साजरा केला होता. आता या सगळ्यांनी सेटवर कांदाभजीची पार्टी केली आहे. याचा खास व्हिडीओ निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातलंय. यामुळे जनजीवन सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. पावसामुळे सोमवारी ( ६ जुलै ) अनेक मालिकांचं शूटिंग रद्द करण्यात आलं. तर, काही कलाकार भर पावसातून सेटवर पोहोचले होते. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या सेटवर सुद्धा सगळे कलाकार उपस्थित होते. या सगळ्यांनी एकत्र येऊन कांदाभजीचा बेत केला होता.
सेटवरच्या किचनमध्ये आजी, मल्लिका काकू आणि सुश्मिता यांनी एकत्र येऊन कांदाभजी बनवली. सुश्मिताने कांदा कापला, आजींनी कोथिंबीर निवडली तर मल्लिकाने कांदाभजीचं सगळं मिश्रण तयार केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी सेटवर समर म्हणजेच सुबोध भावे सुद्धा उपस्थित होता. हे सगळे खूप आनंदाने अन् आपुलकीने सेटवर काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मात्र, या व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना स्वानंदी म्हणजे प्रेक्षकांची लाडकी तेजश्री प्रधान कुठेच दिसली नाही. अनेकांनी स्वानंदी कुठेय, तेजू ताईला मिस केलं अशाही प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत. पण, काही वेळात स्वत: तेजश्रीने या व्हिडीओवर कमेंट करत “हे कधी घडलं?” असं Sad इमोजी शेअर करत विचारलंय. यावर मल्लिका काकूंनी “संध्याकाळी…” असं उत्तर दिलं आहे. यामुळे ही कांदाभजीची पार्टी तेजश्रीने मिस केली आहे.
दरम्यान, या व्हिडीओवर अन्य चाहत्यांनी सुद्धा कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खरंच खूप छान आहे ही मालिका आम्हाला बघताना खूप छान वाटतं”, “या सगळ्यांचं बॉण्डिंग किती छान आहे”, “आम्हाला पण बोलवा”, “किशोरी ताई मस्त” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत. ही मालिका दररोज संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाते.
