Tejashri Pradhan : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत प्रेक्षकांना तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळत आहे. लवकरच मालिकेत समर-स्वानंदीची लव्हस्टोरी सुरू होणार आहे. यानिमित्ताने या दोघांनी टीव्ही माध्यम, कलाकारांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग याबाबत दिलखुलास संवाद साधला.
तेजश्री प्रधान ‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “टीव्ही मालिकांमध्ये काम करताना अनेकांचं असं असतं की, पटकन काम करूयात…मोकळं होऊयात. पण, या सगळ्यात इतका चांगला सहकलाकार मिळणं, आमच्या मालिकेचे इतके सुंदर डायलॉग लिहिलेत…म्हणजे जवळ-जवळ एक सिनेमा केल्याचा फील येतो, ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण, मला टीव्ही माध्यम कायम महत्त्वाचं वाटलंय आणि हे माध्यम खूप जास्त पॉवरफुल आहे. या माध्यमातून खूप कलाकार घराघरांत पोहोचतात, त्यामुळे टीव्ही माध्यम प्रेक्षकांना पटकन आपलंसंही वाटतं. त्यामुळे ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा मला भाग होता आला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”
याबाबत सुबोध भावे म्हणाला, “हो! आम्हा दोघांची वीण सुद्धा तेवढीच घट्ट आहे. कारण, आम्हाला शूटिंगदरम्यान गोष्टी ठरवाव्या लागत नाहीत. गोष्टी न ठरवता आपोआप होतात. कोणतंही काम ओढून ताणून करणं वेगळं आणि सहजतेने करणं वेगळं असतं. जेव्हा आपल्या समोर काम करणारा कलाकार सुद्धा तेवढाच चांगला असतो…. तेव्हा क्रिकेटची एखादी चांगली मॅच पाहताना तुम्हाला जशी मजा येते ना…तशीच मजा त्या कलाकारासह काम करताना येते. तेजू माझ्याबरोबर काम करतेय I Am Happy! तिच्याबरोबर काम करताना खरंच खूप छान वाटतं.”
तेजश्री प्रधान म्हणाली, “मालिकेत ज्या महत्त्वाच्या टप्प्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते..तो क्षण आता प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल. याचबरोबर आपण सगळे पावसाचीही आतुरतेने वाट पाहत होतो. पाऊस आणि वटपौर्णिमेचं शूट या दोन्ही गोष्टी एकत्र जुळून येणं म्हणजे जणू दुग्धशर्करा योगच होता. पावसाच्या सुंदर वातावरणात वटपौर्णिमेचा सीन शूट करताना खूप मजा आली. गेले तीन-चार महिने प्रचंड उष्णतेत शूटिंग सुरू होतं. त्यामुळे हा पावसाचा गारवा आणि ओलावा आम्हा कलाकारांसह टेक्निशिअन्ससाठीही खूप गरजेचा होता. सामान्यतः पावसात शूटिंग करताना चिखल, साडी खराब होणं किंवा इलेक्ट्रिकल उपकरणांमुळे तंत्रज्ञांना होणाऱ्या अडचणी अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पण यावेळी मुंबईतल्या पहिल्या पावसामुळे सेटवरील प्रत्येकजण आनंदी होता आणि सगळे उत्साहाने काम करत होते. आता मालिकेत समर-स्वानंदीच्या लव्हस्टोरीची सुरुवात होती…हे सीन्स पाहून प्रेक्षकही आनंदी होतील.”
“समर आणि स्वानंदी एकमेकांबद्दलच्या भावना कधी व्यक्त करणार आहेत. ते प्रेमात कधी पडणार, याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. लेखकांनी अतिशय सुंदर प्रसंग लिहिले आहेत आणि आम्ही ते तितक्याच प्रामाणिकपणे साकारले. प्रत्येक प्रसंगातील भावना वेगळी होती. एक कलाकार म्हणून त्या भावना अचूकपणे साकारणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान होतं.” असं तेजश्री प्रधानने सांगितलं.
