‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत प्रेक्षकांना या आठवड्यात जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कुटुंबातील तणाव, गैरसमज यापलीकडे मालिकेत एक विशेष ट्रॅक येणार आहे. स्वानंदी आणि समर आश्रमात वृक्षारोपण उपक्रम आयोजित करतात. अनेक अडचणी, अडथळे आणि विरोध असूनही, ते हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार करतात. काही लोक या उपक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात, परंतु समर ठामपणे उभा राहून सर्व परिस्थिती हाताळतो.
या उपक्रमादरम्यान स्वानंदी आणि समर यांच्यातील नातं अधिक घट्ट होताना दिसणार आहे. दोघांमधली जवळीक वाढणार असून, हा संपूर्ण सीक्वेन्स एका गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
याबद्दल सांगताना स्वानंदी म्हणजेच तेजश्री प्रधान म्हणाली, “या गाण्याच्या शूटसाठी मी आमच्या प्रोडक्शनला पूर्ण क्रेडिट देईन. कारण मी नेहमीच उन्हाळ्यात आउटडोअर शूट टाळण्याबाबत आग्रही असते. एवढ्या उष्णतेत काम करणं कठीण वाटतं, त्यामुळे गरज नसेल तर टाळावं असंच माझं मत असतं आणि हे फक्त आमच्या शोसाठी नाही, तर सगळ्यांसाठीच आहे. पण काही सीन खऱ्या वातावरणातच चांगले दिसतात. मला आमच्या प्रोडक्शनचं कौतुक वाटतं की त्यांनी भरपूर सावली आणि झाडं असलेलं लोकेशन निवडलं आणि आमची खूप काळजी घेतली.”
उन्हाळ्यात शूट करताना तेजश्री प्रधान घेते ‘अशी’ काळजी
“आम्ही ठाण्यात शूट करत होतो, पण वातावरण इतकं छान होतं की गावात शूट करत असल्यासारखं वाटत होतं. मी स्वतःही उन्हाळ्यात आवश्यक ती काळजी घेत होते जसं की तुळशीच्या बियांचं पाणी, सब्जाचं पाणी आणि प्रत्येक सीननंतर पांढरा स्टोल वापरणं.”
अवघ्या ४५ मिनिटांत गाण्याचं शूट पूर्ण
“टीममधले सगळेच सुबोध दादा, हरीश आणि इतर कलाकार एकमेकांना सहकार्य करत होते. त्यादिवशी आम्ही गाण्याबरोबरच वृक्षारोपणाचा सीनही शूट केला, या गाण्याचं शूट करण्यासाठी आमच्याकडे फार कमी वेळ होता. आम्ही अवघ्या ४५ मिनिटांत गाण्याचं शूट पूर्ण केलं. मला आशा आहे की हा सीन प्रेक्षकांना नक्की आवडेल, आणि शेवटी एवढंच म्हणेन, की आपण कलाकार म्हणून कधी कधी अशा परिस्थितीत शूट करतो पण काही गोष्टी तशाच छान दिसतात आणि जर आपल्याबरोबर चांगली टीम असेल तर गोष्टींथोड्या सोप्या वाटतात.” असं तेजश्री प्रधानने सांगितलं.
