Veen Doghantali Hi Tutena upcoming twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतील समर व स्वानंदीची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करते. त्यांची जोडी प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. त्यांच्या आयुष्यात सतत काही ना काही घडताना दिसते आणि त्यामुळे मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट पाहायला मिळतात.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, स्वानंदीची आई मंदाकिनीने समरच्या क्रेडिट कार्डचा वापर करून १० लाख रुपये खर्च केले. त्याबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. जेव्हा हे प्रकरण समोर आले, त्यावेळी स्वानंदीच्या वडिलांनी समरचे १० लाख मी परत करेन, असा शब्द दिला. आता ते ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत ट्विस्ट
झी मराठी वाहिनीने, वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, स्वानंदीचे वडील ड्रायव्हरच्या नोकरीसाठी जातात. तिथे गेल्यानंतर गाडीत बसतात आणि गाडीच्या मालकाला म्हणतात, “नमस्कार साहेब, आजपासून मी तुमचा ड्रायव्हर आहे. कुठे जायचे आहे?” त्यानंतर ते त्या व्यक्तीचा चेहरा पाहतात. त्यांना अंशुमन दिसतो. अंशुमनला पाहून स्वानंदीच्या वडिलांना धक्का बसतो. ते आश्चर्याने अंशुमन, असे म्हणतात. त्यावर अंशुमन त्यांना सांगतो की, अंशुमन सर, असं म्हणायचं.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, निकिता आणि स्वानंदी एके ठिकाणी नारळ पाणी पीत आहेत. त्याच ठिकाणी स्वानंदीचे बाबा अंशुमनसाठी कॉफी घेऊन येतात. त्यावेळी ती कॉफी अंशुमनच्या पायावर सांडते. ते पाहून अंशुमन त्यांच्यावर ओरडतो आणि ती कॉफी साफ करण्यास सांगतो. स्वानंदीचे वडील खाली बसतात आणि बुटावर सांडलेली कॉफी रुमालाने साफ करताना दिसतात. त्याच वेळी स्वानंदीला तिचे वडील दिसतात. ती स्वत:शीच बाबा, असे म्हणताना दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘वडिलांचा होणारा अपमान सहन करेल का स्वानंदी?’, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, आता स्वानंदी नेमकं काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
