Veen Doghantali Hi Tutena upcoming Twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका तिचे स्थान टिकवून ठेवते. मालिकेतील स्वानंदी, समर, रोहन, अधिरा, मंदाकिनी, मल्लिका, आजी ही आणि सगळी पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, समर राजवाडे हा उद्योजक असून तो श्रीमंत आहे. त्याचे आई-वडील, बहीण आणि काका यांचे एका अपघातात निधन झाले. त्यानंतर समरने घराची तसेच त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी स्वत:वर घेतली. त्याचे त्याच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे.

तो त्यांच्यासाठी काहीही करू शकतो. मात्र, त्याच्या याच स्वभावाचा आणि विश्वासाचा फायदा त्याची मल्लिका काकू आणि तिची दोन मुले घेतात. समरला फसवण्याचा, सर्व संपत्ती स्वत:कडे घेण्यासाठी ते सतत कट कारस्थान करतात. या सगळ्यात समरची लाडकी बहीण आणि मल्लिकाची मुलगी अधिरा एका मुलाच्या प्रेमात पडते. त्या मुलाचे नाव रोहन असे आहे.

हा रोहन एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याच्या घरात आई-वडील, दोन बहिणी अशी पाच माणसे आहेत. त्यांना महिन्याच्या खर्चाचे नियोजन करावे लागते. सर्व गोष्टींचा विचार करून त्यांना पैसे खर्च करावे लागतात. तरीही श्रीमंत अधिरा रोहनच्या प्रेमात पडते. तिच्या हट्टासाठी आणि रोहन चांगला मुलगा असल्याने समर त्यांचे लग्न लावून देण्यासाठी तयार होतो. मात्र, रोहन अट ठेवतो की त्याच्याआधी त्याच्या मोठ्या बहिणीचे स्वानंदीचे लग्न झाले पाहिजे. समाजाच्या नियमानुसार, वय जास्त झाल्याने तिच्यासाठी चांगली स्थळे येत नाहीत. शेवटी, बहिणीसाठी समर आणि भावासाठी स्वानंदी एकमेकांशी लग्न करतात. त्यानंतर अधिरा रोहनच्या मध्यमवर्गीय कुटुंबात आणि स्वानंदी राजवाडेंच्या श्रीमंत पण स्वार्थी लोकांमध्ये संसार चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत ट्विस्ट

काही दिवसांपूर्वी रोहनची नोकरी अचानक गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आर्थिक गरजा भागवण्यासाठी रोहनने डिलिव्हरी बॉयची नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही गोष्ट त्याने कोणालाही सांगितली नाही. आता मात्र, त्याची नोकरी गेल्याचे सत्य स्वानंदीसमोर येणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

झी मराठी वाहिनीने ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, अधिरा आणि स्वानंदी एका ठिकाणी आहेत. स्वानंदी अधिराला म्हणते की तुझं पार्सल आलं की खाऊन घे. त्यावर अधिरा म्हणते की थांब ना, खाऊन जा. विशेष म्हणजे, हे पार्सल रोहन घेऊन जातो. रोहन घराखाली आल्यानंतर तो मनातल्या मनात विचार करतो की वर जाऊ की नको? त्यानंतर तो मास्क लावून जातो. दरवाजा स्वानंदी उघडते. तिला पाहून रोहनला भीती वाटते. पार्सल देऊन जात असताना तो रोहन असल्याचे स्वानंदीला संशय येतो. रोहन घाईने तिथून निघून जातो. स्वानंदीदेखील त्याच्या मागे जाते. प्रोमोच्या शेवटी स्वानंदी मास्क घातलेल्या रोहनला रोहन अशी हाक मारते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “रोहनच्या नोकरीबद्दल अखेर स्वानंदीला समजणार”, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.