Veen Doghantali Hi Tutena upcoming twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका दिवसेंदिवस गाजत असल्याचे दिसत आहे. मालिकेतील समर व स्वानंदी लक्ष वेधून घेतात. त्यांच्यातील मजेशीर भांडणे प्रेक्षकांना आवडतात. दोन वेगळे स्वभाव असलेली, गोष्टींचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणारी या दोन व्यक्ती आहेत. मात्र, त्यांच्यात एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे त्यांचे त्यांच्या कुटुंबावर प्रेम आहे.
या सगळ्यात समर अनेकदा त्याच्या काकू आणि चुलतभावंडांनी केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करतो, त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. इतकेच नाही, तर त्यांच्यावर कोणी आरोप केले, त्यांना कोणी चुकीचे म्हटले, तर त्याला आवडत नाही. याच गोष्टीचा फायदा घेऊन, त्याची मल्लिकाकाकू व त्याची चुलत भावंडे त्याच्याविरुद्ध कट-कारस्थाने करतात. त्याच्या जवळील माणसांना त्याच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात.
काहीच दिवसांपूर्वी राजवाडे घरातील पारंपरिक मौल्यवान हार आनंदने त्याच्या पत्नीच्या म्हणजेच निकिताच्या बॅगेत ठेवल्याचा आरोप त्याच्यावर केला गेला होता. आनंद हा समरचा सगळ्यात जवळचा मित्र आहे. मात्र, या घटनेनंतर त्यांच्यात दुरावा आला. महत्त्वाची बाब म्हणजे समरने आनंदवर विश्वास ठेवला नाही. परिणामी आनंदला वाईट वाटले आणि त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वानंदीने त्याची समजूत काढली.
समर व आनंद यांची मैत्री पूर्ववत व्हावी, त्या दिवशी नेमके काय घडले होते, याबरोबरच मल्लिका व तिच्या मुलाचे कारस्थान समोर यावे यासाठी स्वानंदी सतत प्रयत्न करत आहे. आता स्वानंदीला मोठे सत्य समजणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
“मी जेव्हा त्यांच्यासाठी…”
झी मराठी वाहिनीने, सोशल मीडियावर वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, राजवाडे कुटुंब मोठ्या उत्साहात रंगपंचमी खेळली जात आहे. यावेळी स्वानंदीला एक फोन येतो. हा फोन राजवाडेंच्या घरात काम करणाऱ्या रोहिणीचा असतो. स्वानंदी तिला विचारते की, तू कशी आहेस? त्यावर ती म्हणते की, सगळं ठीक आहे; पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुम्ही मला भेटाल का? त्यावर स्वानंदी म्हणते, “काय सांगायचं आहे?” आजूबाजूला गोंधळ असल्याने स्वानंदीला रोहिणीचा आवाज येत नाही. स्वानंदी स्वत: मोठमोठ्याने बोलते. यावेळी अर्पिता तिचे हे बोलणे ऐकत असल्याचे दिसते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, स्वानंदी रोहिणीला जाऊन भेटते. तेव्हा रोहिणी तिला सांगते, “तुमच्या वाढदिवसाला हिऱ्याच्या हाराबाबतीत जे काही झालं होतं ना, त्यात आनंदसरांचा काही दोष नव्हता. हे सगळं घडवून आणलं होतं. ” मल्लिका, अंशुमन व अर्पिताचे बोलणे ऐकल्याचे सांगत रोहिणी पुढे म्हणते, “मी जेव्हा त्यांच्यासाठी चहा घेऊन गेले होते ना, तेव्हा हे सगळं माझ्या कानावर पडलं.” त्यानंतर तेजश्री रोहिणीला विचारते की, नेमकं तू काय ऐकलंस?
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘रोहिणी सगळं सत्य स्वानंदीला सांगणार’, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, आता स्वानंदी हे सत्य समर व इतर कुटुंबीयांना कधी सांगणार, मल्लिका व तिच्या मुलांचा खोटारडेपणा, कट-कारस्थाने सर्वांसमोर कधी येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
