Veen Doghantali Hi Tutena upcoming twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतील स्वानंदी, समर यांच्यात सध्या उत्तम मैत्री पाहायला मिळत आहे. संकटाच्या काळात ते एकमेकांना पाठिंबा देतात. संकटांना एकत्रित सामोरे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ते दोघेही त्यांच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम करतात. मात्र, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करते,त्यांची काळजी करते असे नाही.

समर त्याच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम करतो, घरातील प्रत्येकाची काळजी घेतो. पण, त्याची मल्लिका काकू, तिचा मुलगा अंशुमन आणि मुलगी अर्पिता हे सतत समरविरुद्ध कट कारस्थान करताना दिसतात. त्याची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर व्हावी, त्याला व्यवसायात नुकसान व्हावे, त्याच्या आजूबाजूची चांगली माणसे त्याच्यापासून दूर जावीत यासाठी ते काही ना काही करताना दिसतात.

काही दिवसांपूर्वीच अंशुमनने चिंगीला फसवल्याचे समोर आले. मल्लिकाचा मुलगा अंशुमनचे लग्न होते. मात्र, त्याचदरम्यान चिंगी प्रेग्नेंट असल्याचे समजले. स्वानंदीसमोर चिंगीचे रिपोर्ट आले. ते बाळ अंशुमनचे असल्याचे चिंगीने तिला सांगितले. त्यानंतर स्वानंदीने अंशुमनचे सत्य सर्वांसमोर आणत त्याचे लग्न मोडले. आता मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

“कारण, ती माझी बायको आहे”

आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, स्वानंदीची बहीण सुश्मिताच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून समरला आश्चर्याचा धक्का बसतो. तो तिला विचारतो, “तुझं लग्न झालं? मला कळलंच नाही. अभिनंदन! कोण आहे मुलगा? आणि तुझा नवरा कुठे आहे?”, त्यावर समरची आजी अंशुमनकडे बोट दाखवते आणि म्हणते, “हा काय तुझ्यासमोर उभा आहे.” त्यावर समर म्हणतो, “पण, आता चिंगीचं काय?”, त्यावर अर्पिता रागाने पुढे येते आणि म्हणते, “काय चिंगी-चिंगी लावलं आहेय़ चिंगीपुढे घरातल्या माणसांना काहीच किंमत नाही का?”

अर्पिताचे बोलणे ऐकून स्वानंदी तिला म्हणते, “तुम्ही कोणाशी बोलताय, याचं तरी भान ठेवा.” त्यावर अर्पिता तिला रागाने म्हणते, “तू आमच्यामध्ये बोलू नको”, तिचे बोलणे ऐकून समरचा संताप होतो. तो तिला प्रत्युत्तर देत म्हणतो, “बोलणार, कारण- ती माझी बायको आहे. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. नवरा म्हणून त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.” पुढे तो अर्पिताला म्हणतो, “दुसऱ्यांच्या संसारत लुडबूड करण्यापेक्षा स्वत:च्या संसारात लक्ष दे.आताच्या आता बॅग उचल आणि स्वत:च्या घरी निघून जा.त्यानंतर तो अर्पिताला हाताला धरून बाहेर घेऊन जाताना दिसत आहे.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सत्याची बाजू घेण्यासाठी समर भावंडांच्या विरोधात जाणार”, अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, आता मालिकेत काय घडणार,समर व स्वानंदी चिंगीला कसा न्याय मिळवून देणार, अर्पिताला घराबाहेर काढल्यानंतर मल्लिका काय करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.