Veen Doghantli Hi Tutena Upcoming Twist: मालिकांमध्ये येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. मालिकांतील विविध पात्रे, त्यांचे आपापसांतील संबंध, त्यांचे स्वभाव यामुळे मालिकेची गोष्ट प्रेक्षकांना आवडते. अनेकदा आपल्या आवडत्या पात्राच्या आयुष्यात पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही लोकप्रिय मालिका आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतात. समर व स्वानंदी यांच्या आयुष्याच्या भोवतालची गोष्ट पाहायला मिळते. स्वानंदी ही मध्यमवर्गीय घरातील आहे, तर समर हा श्रीमंत घरातील आहे.
समरची बहीण अधिरा ही स्वानंदीचा भाऊ रोहनच्या प्रेमात पडली. लग्न करताना रोहनने सर्वांसमोर अट ठेवली होती की आधी त्याच्या मोठ्या बहिणीचे स्वानंदीचे लग्न झाले पाहिजे. परिस्थिती अशी निर्माण झाली की समर व स्वानंदीला लग्न करावे लागले.
सुरुवातील त्यांच्यात मैत्री नव्हती. इतकेच काय तर अगदी विश्वासाचे नातेदेखील नव्हते. समरच्या मल्लिका काकूला स्वानंदी सुरुवातीपासूनच आवडत नव्हती. त्यामुळे स्वानंदीला समर व राजवाडे कुटुंबाच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी मल्लिकाने खूप प्रयत्न केले. तिच्या मुलांसह मिळून तिने अनेक कट कारस्थाने केली. मात्र, स्वानंदी प्रत्येक कारस्थानाला धैर्याने सामोरी गेली. आता मल्लिकाच्या मुलामुळे म्हणजेच अंशुमनमुळे स्वानंदीच्या वडिलांवर संकट कोसळल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
“मला तुमच्याबद्दल बोलायचे…”
झी मराठी वाहिनीने वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. अंशुमन समरच्या कपाटातून सोन्याची चैन व पैसे काढतो. हे समरला माहित नसते. पण, ते स्वानंदीचे बाबा बघतात. स्वानंदीचे बाबा अंशुमनला म्हणतात, “तुम्ही चैन व पैसे काढले आहेत, हे जसं मला माहित आहे, तसं ते समररावांना माहित आहे का?” यावर अंशुमन म्हणतो, “माझ्याशी असं का बोलत आहात? काय सांगायचं आहे ते मला सांगा.” त्यानंतर स्वानंदीचे बाबा त्याला म्हणतात, “मला तुमच्याबद्दल बोलायचे आहे”, असे म्हणून ते निघून जातात. त्यानंतर अंशुमन त्यांच्या पाठीमागून येतो आणि त्यांना ढकलून देतो. त्यांच्या डोक्याला मार लागतो. ते बेशुद्ध असताना एक व्यक्ती त्यांचा फोन घेतो आणि त्याच फोनवरुन स्वानंदीला फोन लावतो. स्वानंदी फोन उचलते आणि विचारते, “कोण बोलत आहे? हा माझ्या बाबांचा नंबर आहे.” त्यावर ती व्यक्ती म्हणते, “तुमच्या वडिलांचा अपघात झाला आहे.” ते ऐकल्यानंतर स्वानंदीला धक्का बसतो.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “स्वानंदी तिच्या बाबांना वाचवू शकेल का?”, अशी कॅप्शन दिली आहे.
आता स्वानंदी नेमके काय करणार, तिच्या बाबांना ती वाचवू शकणार का, तसेच अंशुमनचे सत्य तिला समजणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
