Veen Doghantli Hi Tutena upcoming twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सध्या एकापेक्षा एक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेत स्वानंदी, समर, अंशुमन, मल्लिका, अधिरा, रोहन ही आणि मालिकेतील सगळीच पात्रे वेळोवेळी लक्ष वेधून घेतात. कोणी कुटुंबावर प्रचंड प्रेम करतं, तर कोणी त्या प्रेमाचा फायदा घेते, कोणी संकाटांचा सामना करत आपल्या माणसांना सर्व अडचणींपासून दूर ठेवते, तर कोणी कारस्थाने करते. वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकाच ठिकाणी असल्यामुळे अनेक गोष्टी घडतात. अनेक वेळा गोंधळही पाहायला मिळतो.

समर राजवाडे हा मोठा उद्योजक आहे. त्याचे आई-वडील, बहीण, काका एका अपघातात वारले. त्यानंतर त्याने घराची जबाबादारी घेतली. स्वत:ला विसरून कुटुंबातील इतरांना प्राधान्य दिले. काकूला आईचा दर्जा दिला. घरातील प्रत्येकावर प्रचंड प्रेम केले. मात्र, त्याचे हे प्रेम त्याच्या काकूला व तिच्या मुलांना कधीच समजले नाही. त्यांनी फक्त त्याच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेतला. त्याच्याकडून पैसे मिळावे, त्याची संपत्ती मिळवता यावी, त्याच्या अवतीभोवती चांगली माणसे असू नयेत, जी आहेत ती दुरावली जावीत यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, स्वानंदी व समरचे लग्न झाल्यापासून मल्लिकाच्या कारस्थानाला यश मिळत नाही, स्वानंदी वेळोवेळी त्यांना उत्तरे देते, त्यांची कारस्थाने त्यांच्यावर उलटवते.

मल्लिका नेमकं काय करणार?

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, मल्लिकाचा मुलगा अंशुमनचे लग्न होते. मात्र, त्याचदरम्यान चिंगी प्रेग्नेंट असल्याचे समजले. स्वानंदीसमोर चिंगीचे रिपोर्ट आले. ते बाळ अंशुमनचे असल्याचे चिंगीने तिला सांगितले. चिंगीला न्याय मिळावा म्हणून स्वानंदीने अंशुमनचे लग्न थांबवले आणि सत्य सर्वांसमोर आणले. जेव्हा सत्य समोर आले तेव्हा ते स्वीकारण्यास अंशुमनने सुरुवाताली नकार दिला, मात्र स्वानंदीच्या प्रयत्नांमुळे सर्वांना त्याचे सत्य समजले. त्यानंतर समरने अंशुमनला निर्णय घेण्यासाठी चार दिवसांची मुदत दिली आहे. आता मात्र मल्लिका वेगळेच कारस्थान करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने, सोशल मीडियावर ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की चिंगी रडत अंशुमनला म्हणते, “माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही या बाळाला तरी नका देऊ.” त्यावर चिडून अंशुमन म्हणतो, “ते पोटात आहे हाच त्याचा दोष आहे, तुझ्याकडे एकच पर्याय आहे गर्भपात कर.”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की स्वानंदी चिंगीच्या खोलीत जाते. तिथे अंधार असतो, चिंगी कुठेही दिसत नाही. स्वानंदी काळजीने स्वत:शीच म्हणते की ही कुठे गेली? दुसरीकडे मल्लिका काही गोळ्यांची बारीक पूड करते आणि ती पूड ती दुधात टाकते. ते दूध अर्पिता घेऊन जात असते त्यावेळी तिची व स्वानंदीची भेट होते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अंशुमनला वाचवण्यासाठी मल्लिका चिंगीच्या जीवाशी खेळणार”, अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान, मालिकेत पुढे काय होणार, स्वानंदी चिंगीला वाचवू शकणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.