Veen Doghantli Hi Tutena upcoming twist: समर व स्वानंदी यांचे लग्न त्यांच्या मर्जीने नाही तर परिस्थितीमुळे झाले. मात्र, कालांतराने त्यांच्यात मैत्री झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आता ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. संकटाच्या काळात एकमेकांबरोबर असतात.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, स्वानंदीला इतर स्त्रियांनी तुझं वय जास्त झालं आहे, त्यामुळे तुला मूल होणार नाही, असे म्हणत टोमणे मारले होते. त्यानंतर स्वानंदीला वाईट वाटले होते. मात्र, समरने तिची समजूत घातली होती. आता मात्र समर व स्वानंदीला आनंदाची बातमी मिळणार का, असे प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्वानंदी व समर आई-बाबा होणार?

झी मराठी वाहिनीने, सोशल मीडियावर वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की समर खोलीत येतो. तो स्वानंदीशी बोलण्यासाठी जातो, तेव्हा ती काहीतरी लपवताना दिसते. ती काय लपवत आहे, हे जाणून घेण्यासाठी समर तिच्या मागे धावतो.

या धावपळीत स्वानंदीच्या हातातील प्रेग्नन्सी टेस्ट किट खाली पडते. ते पाहून समर तिला आनंदाने विचारतो, प्रेग्नन्सी टेस्ट किट? आपल्याला बाळ होणार ?” त्यावर स्वानंदी त्याला म्हणते, “असं वाटतंय, आधी टेस्ट करून बघू.” त्यानंतर स्वानंदी टेस्ट करण्यासाठी जाते. मात्र, समरची उत्सुकता वाढत जाते. तो अस्वस्थ होतो. खोलीत इकडे तिकडे फेऱ्या मारतो.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “स्वानंदी देणार समरला गुड न्यूज”, अशी कॅप्शन दिली आहे.

या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “खूप उत्सुक आहे”, “आशा आहे की समर व स्वानंदीला आनंदाची बातमी मिळेल”, “कुणी तरी येणार गं”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, आता मालिकेत काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.