‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येताना दिसतात. काही दिवसांपूर्वी मंदाकिनीने समरचे क्रेडिट कार्ड वापरून १० लाख रुपयांची खरेदी केली होती. ज्यावेळी ही गोष्ट सर्वांसमोर आली, त्यावेळी स्वानंदीच्या बाबांनी पैसे परत करेन, असे सांगितले.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, पैसे जमा करण्यासाठी स्वानंदीच्या बाबांना काहीतरी काम करण्याची गरज होती. त्यांना ड्रायव्हरची नोकरी मिळाली. मात्र, त्यांना समरचा लहान भाऊ अंशुमनचा ड्रायव्हर म्हणून नोकरी करावी लागत आहे. अंशुमन त्यांना त्रास देत असल्याचे पाहायला मिळते. स्वानंदी किंवा तिच्या घरातल्या इतर कोणालाही त्यांच्या या नोकरीबद्दल काहीही माहीत नाही. आता मात्र हे सत्य स्वानंदीसमोर येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने, सोशल मीडियावर वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, स्वानंदीला तिच्या बाबांचा आवाज ऐकू येतो. तितक्यात तिचे बाबा तिथून निघून जातात. स्वानंदी एका रिक्षात बसते आणि रिक्षावाल्याला सांगते की, ती गाडी दिसतेय तिचा पाठलाग करा.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, स्वानंदीचे बाबा चहाचा कप अंशुमनला नेऊन देतात. तो कप अंशुमनच्या पायावर पडतो. त्यानंतर अंशुमन स्वानंदीच्या बाबांना म्हणतो, “म्हाताऱ्या तुझे डोळे फुटलेत का?” स्वानंदीचे बाबा म्हणतात, “मला कळलं नाही.” पण, चिडलेला अंशुमन त्यांच्यावर हात उगारतो. तितक्यात स्वानंदी तिथे येते. ती अंशुमनचा हात पकडते.

ती अंशुमनला म्हणते, “नालायक, वयस्कर माणसावर हात उगारताना तुला लाज वाटत नाही का?” स्वानंदीचे बाबा तिथून निघून जात असतात. त्यांनी मास्क लावल्यामुळे स्वानंदी त्यांना काका, अशी हाक मारते. ती त्यांना म्हणते, “काका, तुम्ही अशा माणसाकडे का काम करत आहात?” त्यावर अंशुमन म्हणतो, “काहीही झालं तरी हा म्हातारा नोकरी सोडू शकत नाही.” त्यानंतर स्वानंदीचे बाबा चेहऱ्यावरचा मास्क काढतात. त्यांना पाहून स्वानंदी भावूक होते. ती रडताना दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘वडिलांचे कटू सत्य अखेर स्वानंदीसमोर येणार’, अशी कॅप्शन दिली आहे. आता स्वानंदी पुढे काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.