Veen Doghatli Hi Tutena: मालिकांमध्ये भांडणे, प्रेम, कलह, कटकारस्थाने, नात्यांतील दुरावा अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. इतकेच नाही, तर या सगळ्याचा परिणाम म्हणून मालिकेत विविध ट्विस्ट येताना दिसतात.
झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतील ही तुटेना या मालिकेतदेखील सतत विविध ट्विस्ट येताना दिसतात. रोहन आणि अधिरा यांचे एकमेकांवर प्रेम होते म्हणून त्यांनी लग्न केले. त्यांच्यामुळे स्वानंदी आणि समर यांनादेखील लग्न करावे लागले. लग्नानंतर रोहनच्या आईमुळे अधिरा अनेकदा दुखावली जात होती; तर दुसरीकडे अधिराच्या आईला म्हणजेच मल्लिकाला अधिरा व रोहनचे लग्न मोडायचे होते.
संक्रांतीच्या दिवशी रोहन जेव्हा अधिराच्या म्हणजेच राजवाडेंच्या घरी पूजेसाठी येत होता. त्यावेळी मल्लिकाने अशी एक योजना आखली, ज्यामुळे रोहनचा अपघात झाला. हा अपघात मल्लिकाचा मुलगा अंशुमनने घडवून आणला होता; पण त्यानंतरही रोहन राजवाडेंच्या घरी पोहोचला.
अधिरा आणि रोहनमध्ये आणखी गैरसमज निर्माण करण्यासाठी मल्लिकाने आणखी एक कारस्थान केले, ज्यामध्ये तिने रोहनच्या आईलादेखील सामील करून घेतले. मल्लिकाने मंदाकिनीला पैशाचे आमिष दाखवले. तिने रोहनला कोणतीही कल्पना नसताना घटस्फोटाचे पेपर अधिराला पाठवले. तिला असे सांगण्यात आले की, रोहनला हे लग्न नको आहे म्हणून त्याने घटस्फोटाचे पेपर पाठवले आहेत. ते पेपर पाहिल्यानंतर अधिराने टोकाचे पाऊल उचलले. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; मात्र तिची समजूत काढली गेली. त्यानंतर समर स्वानंदीवरदेखील चिडल्याचे पाहायला मिळत आहे.
“मी अशी कधीच कोणती नोटीस…”
आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, स्वानंदी तिच्या माहेरी आली आहे. ती रागाने रोहनला कानाखाली मारते. ती त्याला म्हणते, “तू अधिराला घटस्फोट देतोयस… तिचा इतका कुठला मोठा गुन्हा झाला?” पण तितक्यात त्याची आई म्हणते, “तू बरोबर केलं आहेस, जे काही केलं आहेस ते” ते ऐकून स्वानंदी म्हणते, “ती जीव द्यायला निघाली होती.” ते ऐकल्यानंतर रोहनला धक्का बसतो.
स्वानंदी पुढे म्हणते, “तू का केलंस असं?” स्वानंदीचे बोलणे ऐकल्यानंतर रोहन म्हणतो, “मी अशी कधीच कोणती नोटीस पाठवली नाही.” स्वानंदी विचारते, “मग, हे सगळं झालं कसं?” तितक्यात स्वानंदीचे बाबा तिच्या आईला उद्देशून म्हणतात, “हे सगळं हिनंच केलं असणार.” मंदाकिनीला रोहनची शपथ घ्यायला लावत ते म्हणतात, “रोहनची शपथ घे आणि सांग की, तू हे केलेलं नाहीस.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘स्वानंदीसमोर येणार आईचा खरा चेहरा’, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, मालिकेत काय घडणार, झालेले गैरसमज कसे दूर होणार, स्वानंदी नेमके काय करणार, मंदाकिनी, मल्लिका, अंशुमन यांचे सत्य सर्वांसमोर येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
