Veen Doghatli Hi Tutena upcoming twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिकेत आहे. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत समर आणि स्वानंदीची गोष्ट पाहायला मिळते. समर आणि स्वानंदीने तडजोड म्हणून हे लग्न केले आहे. स्वानंदीचा भाऊ रोहन आणि समरची बहीण अधिरा यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू होती.
यादरम्यान, रोहनने सर्वांसमोर अट ठेवली की जोपर्यंत त्याच्या नंदू ताईचे म्हणजेच स्वानंदीचे लग्न होत नाही, तोपर्यंत तो लग्न करणार नाही. त्यानंतर स्वानंदीसाठी अनेक स्थळे पाहिली. स्वत: समर राजवाडेने तिच्यासाठी मुले पाहिली. एकाबरोबर तिचे लग्न ठरले. मात्र, साखरपुडा होत असताना मल्लिकाच्या कारस्थानामुळे तिचे ते लग्न मोडले. परिस्थिती अशी निर्माण झाली की समर आणि स्वानंदीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि कुटुंबाची परिस्थिती या सगळ्यात फरक असतानाही भावंडांच्या प्रेमापोटी त्यांनी लग्न केले. हे लग्न होत असताना समरची काकू मल्लिकाने अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.
मध्यमवर्गीय कुटुंबात अधिराचे लग्न व्हावे किंवा त्या कुटुंबातील स्वानंदी श्रीमंत घरात यावी, असे मल्लिकाला वाटत नव्हते. त्यामुळे तिने समर आणि स्वानंदीमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न केले. या सगळ्यात ती अनेकदा यशस्वी झाली. त्यामुळे समर आणि स्वानंदीमध्ये गैरसमज झाले. स्वानंदी व तिचे कुटुंब पैशासाठी लोभी आहे, असे समरला वाटले.
“काकू, वेळीच सावरा…”
आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये स्वानंदी आणि मल्लिका समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. झी मराठी वाहिनीने वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, मल्लिका म्हणते, “गेली २५ वर्षे इथे माझी सत्ता आहे”, त्यावर स्वानंदी म्हणते, “काकू, वेळीच सावरा. सत्ताबदल व्हायला २५ दिवसही पुरतात”, असे म्हणत स्वानंदी मल्लिकाने प्रत्युत्तर देते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “स्वानंदी आणि मल्लिका समोरासमोर येणार”, अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान, आता मालिकेत नेमकं काय घडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
