Veen Doghatli Hi Tutena upcoming twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तसेच सुबोध भावेदेखील तिच्याबरोबर प्रमुख भूमिकेत दिसत आहे.

मालिकेत तेजश्री प्रधानने स्वानंदी ही भूमिका साकारली आहे, तर सुबोध भावेने समर ही भूमिका साकारली आहे. समर हा राजवाडे कुटुंबातील मोठा मुलगा आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर आजी आणि काकूने त्याचा सांभाळ केला, त्यामुळे राजवाडे कुटुंबाची त्याने जबाबदारी घेतली आहे.

काकू मल्लिका आणि तिच्या मुलांचा तो प्रेमाने सांभाळ करतो. काकूविषयी त्याच्या मनात मोठ्या प्रमाणात आदर आहे. तसेच तो त्याच्या चुलत भावंडांवर खूप प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो. विशेष म्हणजे त्याचे अधिरावर खूप प्रेम आहे. अधिराचादेखील त्याच्यावर खूप विश्वास आहे. मात्र, इतर सगळे त्याचा फायदा घेताना दिसतात.

Award Banner

समर आणि स्वानंदीचे लग्न वेगळ्या परिस्थितीत झाले. कुटुंबासाठी त्यांना तडजोड करावी लागली. लग्नानंतरही ते एकमेकांशी भांडताना दिसले. मल्लिका काकू आणि तिच्या मुलांनी त्यांच्यात कायमच गैरसमज केले, त्यामुळे त्यांच्यात अद्याप मैत्रीचे नातेही निर्माण झाल्याचे दिसले नाही.

आता मात्र समोर आलेला प्रोमो पाहिल्यानंतर समर आणि स्वानंदीच्या नात्यात नवीन वळण येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

स्वानंदी आजीला देणार ‘ते’ वचन

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, आजी आणि स्वानंदी दोघी एकत्र बाहेर गेल्या आहेत. स्वानंदी आजीला समजावत सांगत म्हणते, “समर राजवाडेंच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातोय.”

आजी स्वानंदीला सांगते, “त्याचे आई-बाबा, काका, बहीण सगळे त्या अपघातात त्याच्या वाढदिवसादिवशी गेले. त्याच्या मनामध्ये हे बसलं आहे की या सगळ्याला आपणच जबाबदार आहे.”

स्वानंदी आजीला म्हणाली, “त्यांच्या विक्षिप्त वागण्यामागे लहान मूल दडलेलं आहे हे मला कळलं आहे.” पुढे स्वानंदी आजीला आश्वस्त करत म्हणते, “मी तुमच्या नातवाची आयुष्यभर साथ देईन आणि त्यांच्या शत्रूंविरुद्ध उभी राहीन.” स्वानंदी असे बोलल्यानंतर आजी तिला प्रेमाने मिठी मारते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “स्वानंदी आजीला देणार समरची आयुष्यभर साथ देण्याचं वचन”, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत नेमकं पुढे काय घडणार, मल्लिकाचा खरा चेहरा स्वानंदी समरसमोर कधी आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.