Gargi Phule-Thatte Expressed Regret: गार्गी फुले-थत्ते या त्यांच्या एकापेक्षा एक भूमिकांसाठी ओळखल्या जातात. त्यांची ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील पुष्पा निमकर ही भूमिका चांगलीच गाजली. या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
‘तुला पाहते रे’नंतर ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकांतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. याबरोबरच त्यांनी मुलाखतींमध्ये त्यांच्या खासगी तसेच व्यावसायिक आयुष्यबाबत त्यांनी अनेकदा वक्तव्य केले आहे. तसेच त्या वडील निळू फुलेंबद्दलदेखील आठवणी सांगताना दिसतात.
गार्गी फुले-थत्ते काय म्हणाल्या?
आता गार्गी फुले-थत्ते यांनी नुकतीच ‘वास्तव कट्टा’ला मुलाखत दिली. यावेळी सोशल मीडियावरील स्टार व कलाकार यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केले. गार्गी फुले म्हणाल्या, “इन्स्टाग्रामच्या रीलमुळे खूप कलाकार नाही तर खूप रील स्टार समोर आले. कलाकार असणं वेगळं आहे आणि रील स्टार असणं वेगळं आहे. नाटक, चित्रपट, मालिका या सगळ्या माध्यमांचं दुर्देव आहे, आपण स्टार शोधतो, आपण कलाकार शोधत नाही.
“जर आपण कलाकार शोधले असते तर आज इन्स्टाग्रामवरील जे स्टार आहेत, त्यांना काम मिळणं बंद झालं असतं. मला खूप वाईट वाटतं की आम्ही २० वर्षे जेव्हा कलेच्या क्षेत्रात शिक्षण-प्रशिक्षण घेतो, आम्ही कष्ट करतो, तेव्हा आम्हाला कोणीच विचारत नाही. कोणीतरी रील स्टार येते किंवा येतो, त्यांना अचानक हिरो किंवा हिरॉइनची पात्र साकारायला मिळतात किंवा त्यांना उत्तम काम दिलं जातं.
“ते त्यांच्याकडून प्रेक्षकांपर्यंत किती पोहोचतं हा पुढचा प्रश्न आहे. पण, लोकांना हल्ली तेच हवं आहे का, हादेखील प्रश्न मला कधीतरी पडतो. चॅनेल किंवा चित्रपटांच्या निर्मात्यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे का? तशीच जर प्रसिद्धी हवी असेल तर चित्रपट चालत नाही, ही सत्यस्थिती आहे. असंच होणार आहे. जर तुम्ही चांगले कलाकार घेऊन एका सकस कथेवर सकस चित्रपट किंवा मालिका कराल तेव्हा ते उत्तम चालेल. पण, तुम्हाला रील स्टार हवे आहेत.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गार्गी फुले-थत्ते यांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. गार्गी यांनी स्वतःचं Solitude Holiday हे ट्रॅव्हलिंग अॅप लाँच केलं आहे. या माध्यमातून आवडत्या कलाकारांबरोबर देश-विदेशात फिरायला मिळणार आहे.