Lapandav Upcoming Twist: मालिकांमध्ये सतत नवनवीन ट्विस्ट येत असतात, त्यामुळे मालिकांमध्ये पुढे काय घडणार ही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असते. मालिकांतील ट्विस्ट पात्रांची समीकरणे बदलतात. त्यांच्या आयुष्यात नवीन वळण येते. याबरोबरच नवीन कलकारांची एन्ट्री आणि जुन्या कलाकारांची एक्झिट यांमुळेदेखील मालिकांमध्ये अनेक बदल पाहायला मिळतात.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लपंडाव’ या मालिकेत सखी व कान्हा यांची गोष्ट पाहायला मिळते. सखीच्या मनात आईच्या अगदी लहानपणीच्या चांगल्या आठवणी होत्या. मात्र, अचानक आईच्या वागण्या-बोलण्यात, प्रेमात बदल झाल्याचे दिसले. आई ऐवजी सरकार म्हटले जावे असे तिला सांगितले.
गेली अनेक वर्षे सखीच्या मनात अनेक प्रश्न होते. हे संपूर्ण कोडे कान्हाने सोडवले. जी व्यक्ती सखीची आई तेजस्विनी म्हणून घरात वावरत होती, ती खरे तर मनस्विनी होती. मनस्विनी ही तेजस्विनीची जुळी बहीण आहे. त्या अगदी सारख्याच दिसत असल्याने आणि मनस्विनीने तेजस्विनीला इतकी वर्षे कैद करून ठेवल्याने तिचे हे कारस्थान कोणालाच समजले नव्हते. मात्र, कान्हाने तिच्या कारस्थानाचा सर्वांसमोर उलगडा गेला. तरीही मनस्विनी काही ना काही कट करत असल्याचे दिसते. आता मनस्विनीला धडा शिकवण्यासाठी, तिला आव्हान देण्यासाठी मालिकेत नवीन एन्ट्री होणार आहे.
‘लपंडाव’ या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्रीची एन्ट्री
‘लपंडाव’ या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांची एन्ट्री होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उषा नाईक दिसत आहे. उषा नाईक यांचा एक वेगळा लूक पाहायला मिळत आहे. त्यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. पदर खोवला आहे. कपाळावर मोठी टिकली दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना, “सरकारला आव्हान देण्यासाठी नंदाची होणार एन्ट्री”, असे लिहिले आहे. तसेच, एक व्हिडीओ शेअर करत मालिकेची नवीन वेळ देखील सांगितली आहे. ही मालिका दुपारी पाऊणे दोन वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.
उषा नाईक यांच्या ‘लपंडाव’ मालिकेतील पात्राबद्दल बोलायचे तर नंदा ही मनस्विनी आणि तेजस्विनीची मावशी आहे. अत्यंत खुनशी, स्वार्थी आणि सूडबुद्धीची आहे. पारंपरिक वेशातली, चेहऱ्यावर कृत्रिम माया पण डोळ्यांत कायम हिशोब ठेवणारी नंदा सतत लावणी गुणगुणत असते. नंदा नात्यांना प्रेम आणि आपुलकीच्या मापात न मोजता कायम फायद्या तोट्याच्या तराजूत तोलते. एखाद्याला प्रेमाने जवळ घेत पुढच्याच क्षणी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव ती आखू शकते. समोरच्याची कमकुवत नस नंदाला अचूक पकडता येते. मेलोड्रामा हे तिचं हुकमी शस्त्र आहे. कधी रडते, कधी बेशुद्ध पडते, कधी काळजावर हात ठेवत समोरच्याला धडकी भरवते. वय झालं तरी तिची महत्त्वाकांक्षा संपली नाही. मनस्विनीबरोबर नंदा नेमका कोणता लपंडाव खेळणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
दरम्यान, आता नंदाच्या एन्ट्रीनंतर मालिकेत काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत उषा नाईक यांनी साकारलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये सकारात्मक, नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.
