‘निशा और उसके कजिन्स’मध्ये आपल्या खास भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या टेलिव्हिजन अभिनेता विभू राघवचं सोमवारी निधन झालं. अभिनेत्याचं खरं नाव वैभव कुमार सिंह राघव. मुंबईत अभिनेत्यानं शेवटचा श्वास घेतला. विभू राघव बऱ्याच काळापासून चौथ्या टप्प्यातील आतड्याच्या कर्करोगानं (कोलन कॅन्सर) ग्रस्त होता. अखेर कॅन्सरनं अभिनेत्याचं आयुष्य हिरावून घेतलं.

विभू फक्त ३७ वर्षांचा होता आणि त्याच्या जाण्यानं लोकांना दुःख होत आहे. विभू कोलन कर्करोगाशी झुंजत होता. अलीकडेच त्यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून, त्याचा प्रवास शेअर केला होता.

विभूची शेवटची सोशल मीडिया पोस्ट

विभूची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये विभू कर्करोगाशी लढतानाचा त्याचा अनुभव शेअर करीत आहे. हा व्हिडीओ एप्रिलचा आहे आणि तो पाहून चाहते आता भावूक होत आहेत.

इन्स्टाग्रामच्या त्याच्या व्हिडीओमध्ये विभू म्हणतो, “नमस्कार मित्रांनो! उपचारांबद्दल अपडेट द्यावं, असं वाटलं. डिसेंबरमध्ये पीईटी स्कॅनमध्ये असं दिसून आलं की, कर्करोग यकृतापासून छाती, पाठीचा कणा आणि इतर काही भागांमध्ये पसरला आहे. केमोथेरपीच्या चार फेऱ्यांनंतरही स्कॅनमध्ये कोणतीही सुधारणा दिसून आली नाही; पण आम्ही आशा सोडली नाही. आता एक नवीन उपचार सुरू आहे. फिंगर क्रॉस केले आहे… आणि मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे.”

संपूर्ण व्हिडीओमध्ये विभू आजारी असल्याचे दिसून येते; पण त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसते. त्याला माहीत होते की, आजार गंभीर आहे; परंतु तो कॅमेऱ्यासमोर सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत होता आणि चाहत्यांशी पूर्ण उत्साहानं बोलत होता.

कर्करोगाच्या उपचारासाठी खूप खर्च येत होता आणि त्याचं कुटुंब आर्थिक संकटातून जात होतं. म्हणून इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रांनी त्याला मदत केली आणि लोकांना मदतीचं आवाहनही केलं. सौम्या टंडन, अनिरी वजानी व सिंपल कौल यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे लोकांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘निशा अँड हर कजिन्स’ व ‘सावधान इंडिया’ यांसारख्या शोमधून विभूला ओळख मिळाली. लोकांना हसवणाऱ्या विभूचं वैयक्तिक आयुष्य खूप वेदनादायक होतं.