विजय पटवर्धन हे नुकतेच ‘पारू’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या मालिकेत त्यांनी श्रीकांत किर्लोस्कर ही भूमिका साकारली होती. अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर यांची भूमिका चांगलीच गाजली. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. मात्र, पारू मालिका अचानक बंद झाली, तेव्हा मात्र प्रेक्षक नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.

विजय पटवर्धन, मुग्धा कर्णिक, शरयू सोनावणे, श्रृतकिर्ती सावंत यांनी पोस्ट शेअर करत मालिका बंद झाल्यानंतर प्रेक्षकांचे आभार मानले होते. तसेच, विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक यांनी नवीन नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली होती.. कॅरी ऑन स्पायगिरी या नाटकात ते एकत्र दिसत आहेत. 

आता या सगळ्यात विजय पटवर्धन हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की पैसे बुडवण्याचा कधी अनुभव आला का? यावर विजय पटवर्धन म्हणाले, “हो, हे माझ्याबाबत झालं आहे. चेक मिळाला आणि तो बाऊन्स झाला असं झालं आहे. साधारणपणे लॉकडाऊनच्या अलीकडे पलीकडे हे झालं आहे आणि आताही एक मालिका करत होतो, तेव्हाही हे झालं आहे. पण, ते होईल. मॅनिफॅस्टेशनवर माझा विश्वास आहे, ते पैसे मिळतील.”

आतापर्यंत पैसे मिळालेच नाहीत, ती एकूण किती किंमत असेल? यावर विजय पटवर्धन म्हणाले, “आतापर्यंत पैसे मिळालेच नाहीत, असे जवळजवळ दहा लाख रुपये आहेत, ते पैसे मला मिळालेच नाही.”

ती रक्कम खूप महत्त्वाची होती, त्याचा दोष द्यावासा वाटतो का? यावर ते म्हणाले, “हो, दोष द्यावासा वाटतो, कारण अडीअडचणीला ती रक्कम मिळाली नाही. दुर्देवाने माझ्या बायकोला कॅन्सर असल्याचे निदान झाले. तिच्या वैद्यकीय कारणांमुळे मेडिकल इन्शुरन्ससुद्धा नव्हता, खूप मोठा खर्च झाला होता. त्यावेळेला जर ती रक्कम मिळाली असती, जी आतापर्यंत अजून मिळाली नाही तर मदत झाली असती. मी त्या माणसाला फोनही केला की माझी अशी अडचण आहे.”

“नुकताच लॉकडाऊन संपला होता. जी काही जमापुंजी होती, ती लॉकडाऊनमध्ये खर्च झाली होती; तर फोन करून मी त्याला अडचण सांगितली होती. तर त्याने काही होणार नाही असं सांगितलं. मेसेज केले, पण त्याचं काही उत्तर आलं नाही. सुदैवाने पत्नीने काही पैसे बचत केले होते, त्यामुळे आम्ही त्या परिस्थितीतून मार्ग काढू शकलो. पण, त्यावेळी असं वाटलं की पैसे पाहिजे होते. आपण सोडून देतोय, माणूस आहे, कधी ना कधी देईल, असा विचार करतो, पण आता जर अडचण असेल तर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे; तर त्यावेळेला नाही झालं. त्यातून आम्ही शिकलो. आपल्या अडचणीमध्ये कोणी उभं राहिलं नाही, पण आपण लोकांच्या अडचणींमध्ये उभं राहूया असं ठरवलं आणि विजय पटवर्धन फाउंडेशन सुरू केलं. लॉकडाऊनच्या काळात जे कोणी अडचणीत होते, आम्ही त्यांना मदत केली,” असे म्हणत अडचणींच्या वेळी पैसे न मिळाल्याचे विजय पटवर्धन यांनी सांगितले. 

दरम्यान, याआधी शशांक केतकरसह अनेक कलाकारांनी त्यांचे पैसे बुडाल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.