Kamali Fame Vijaya Babar : सध्या गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण आहे. १४ सप्टेंबरला घराघरांत आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. मनोरंजन विश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यामुळे शूटिंगमधून वेळ काढत या सगळ्या कलाकारांनी बाप्पाची सेवा करण्यासाठी खास सुट्ट्या देखील घेतल्या आहेत. गौरी-गणपतीच्या सणाचा खास अनुभव ‘कमळी’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विजया बाबरने सांगितला आहे. गौरी आगमनाच्या दिवशी विजया आवर्जून सुट्टी घेते. तिने आणखी काय-काय आठवणी सांगितल्यात सविस्तर जाणून घेऊयात…

विजया बाबर म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी ‘कमळी’ म्हणते, “दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही गणेशोत्सवाची जल्लोषात तयारी करत होतो. माझी ताई, जिजू, दादा, वहिनी, मी आणि आमचे फॅमिली मेंबर्स असा आमचा एक फॅमिली ग्रुप आहे. त्यात डेकोरेशन, बाप्पाच्या मूर्तीचं सिलेक्शन अशा अनेक विषयांवर आमच्या चर्चा होत असतात आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या आयडिया देत असतो. आमच्याकडे गणेशोत्सव खूप छान आणि अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. गणेशोत्सव म्हटलं की रात्रभर जागून केलेलं डेकोरेशन मला खूप खास फीलिंग देतं. आधी कितीही ठरवलेलं असलं तरी आदल्या रात्री जे होतं, तेच फायनल डेकोरेशन असतं.”

vijaya babar
कमळी फेम अभिनेत्री विजया बाबर

विजया पुढे सांगते, “गौरी आगमन ही माझ्यासाठी खूप स्पेशल गोष्ट असते. गौरी आगमन आणि गौरीचं जेवण या दोन गोष्टींची मी वर्षभर आतुरतेने वाट बघत असते. छान वाजत-गाजत, ताट वाजवत आम्ही गौरीचं आगमन करतो. रात्री गौरीला दागिने घालण्यापासून ते सजवण्यापर्यंत खूप सुंदर माहोल असतो. कितीही काहीही झालं तरी गणपतीच्या पहिल्या दिवशी, गौरी आगमन आणि गौरीच्या जेवणाच्या दिवशी माझी सुट्टी कन्फर्म असतेच. म्हणजे जगातली कुठलीही सुट्टी माझी कॅन्सल झाली तरी मला चालते, पण या सुट्ट्या मी कधीच कॅन्सल करत नाही.”

vijaya babar
विजयाच्या घरची गौराई

“गौरीच्या जेवणाच्या दिवशी आमच्याकडे प्रॉपर पुरणपोळीचं जेवण असतं. कटाची आमटी, भात, भजी, गोडधोड असे सगळे पदार्थ नैवेद्याला दाखवले जातात आणि रात्री मग आम्ही गौरी-गणपती जागवतो. छान मंगळागौरीचे खेळ खेळतो. मंगळागौरीचे खेळ खेळून झाल्यावर आपली इच्छा देवीच्या कानात सांगायची असते. अशी प्रथा आहे आणि आम्ही अजूनही ही प्रथा पार पाडतो. गौरी जागरणाच्या दिवशी आई शेवटचं जे गाणं गाते, ज्यात देवीला लेक म्हणून संबोधलं जातं आणि तिची सासरी परत पाठवणी केली जाते, त्या वेळी आम्ही सगळेच खूप इमोशनल झालेलो असतो. माझ्या अंगावर आताही सांगताना काटा येतोय.” अशी सुंदर आठवण विजयाने चाहत्यांना सांगितली आहे.