Vinesh Phogat Disqualified in Paris Olympics 2024 : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीआधी अपात्र ठरवण्यात आल्याने संपूर्ण देशभरातून सध्या हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तिने ५० किलो वजनी गटातून अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीआधी विनेशचं वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. हा सगळ्या भारतीयांसाठी खूप मोठा धक्का होता.

विनेश ( Vinesh Phogat ) अपात्र ठरल्यानंतर सध्या सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. मराठी कलाविश्वातून आस्ताद काळे, अभिजीत केळकर, उत्कर्ष शिंदे, ऐश्वर्या नारकर, प्रथमेश परब, हेमंत ढोमे, तेजस्विनी पंडित यांसारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता यासंदर्भात ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतील अभिनेता समीर परांजपेने विनेशला उद्देशून भावुक करणारी पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा : “तुझं अपात्र होणं, जिव्हारी…”, विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर मराठी कलाविश्वात नाराजी, अभिनेत्यांच्या पोस्ट चर्चेत

अभिनेता समीर परांजपेची विनेश फोगटसाठी पोस्ट

प्रिय विनेश,
होय… आता ‘प्रिय लिहिणारच.. वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं आहेस अगं… Trending आहेस तू .. ‘धाकड हैं धाकड हैं’ ऐकू येतंय… जिथे तिथे..१०० ग्रॅमने ते मेडल हुकल्याची चर्चा आहे. पण, ठीक आहे आता येत्या वीकेंडला “बसून” चर्चा करून ठरवू आम्ही नक्की काय झालं ते… म्हणजे सगळ्या शक्यता तपासू. यामागे नक्की कुणाचा हात होता हे शोधून काढूच आम्ही. मग त्याच्या नावाने सोशल मीडियावर शंख करू… तू काळजीच करू नकोस… काही महिन्यांपूर्वी तुला रस्त्यावरून फरपटत नेताना आम्ही केला होता ना शंख अगदी तेवढाच धारदार… बोललो होतो खेळ सोडून हिला आता हिरो बनायची काय हौस आहे. Politics आहे रे सगळं… नाटकं आहेत सगळी… करिअर संपणार बघ हिचं. पण, आमची सगळ्यांची ठासलीस.. “बांबू” नाही पॅरिसचा “आयफेल टॉवर” लावलास आम्हाला… कौतुक किंवा सांत्वन वगैरे काही करणार नाही. कारण, त्या कशाचीच तुला गरज नाहीये. तु अजेय आहेस. पण एक नक्की.. जेव्हा कधी प्रतिकूल परिस्थितीत ही संकटाच्या छाताडावर उभं राहणं म्हणजे काय? हे कोणाला सांगायची वेळ येईल ना तेव्हा फक्त तुझा हा फोटो दाखवेन मी समोरच्याला… Happy Ending नसणारे, वेगळ्याच ट्विस्टने संपणारे हॉलीवूड सिनेमे बघत बॉलीवूडच्या हॅप्पी Ending सिनेमांना शिव्या घालणारे आम्ही आज मात्र हॅप्पी Ending होऊदे यासाठी प्रार्थना करत होतो. पण, बहुदा नियतीलाही हे माहिती असावं की हा The End नाहीये, असता कामा नये… पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..

हेही वाचा : Vinesh Phogat : चेहऱ्यावर निराशापूर्ण स्मित, उपचार सुरु, ऑलम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटचा पहिला फोटो समोर

दरम्यान, समीरने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत विनेशला पाठिंबा दिला आहे. मराठी कलाकारांप्रमाणे बॉलीवूड कलाविश्वातून सुद्धा विनेश फोगाट ( Vinesh Phogat ) अपात्र झाल्याबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे.