‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने अनेक कलाकार घडवले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दर्जेदार विषयांवर आधारित स्कीट सादर करत यातील कलाकारांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली आणि त्यांच्या केलच्या जोरावर इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली. यापैकीच एक म्हणजे अभिनेता विराज जगताप.
विराज जगताप ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचला. यातील त्याच्या कामाचं अनेकांकडून कौतुक झालं. अशातच आता त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याचा खडतर प्रवास, त्याने केलेला संघर्ष, दिसण्यावरुन मिळालेले टोमणे आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील किस्सा याबद्दल सांगितलं आहे. विराज या शोमध्ये अभिनेता म्हणून काम करण्यापूर्वी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायचा असंही त्याने सांगितलं आहे. त्यादरम्यान त्याला शोचे दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी यांचा ओरडा पडला होता याबद्दलही सांगितलं आहे.
विराजने सांगितला सेटवरचा प्रसंग
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत विराजला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर कधी ओरडा पडलाय का असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “मला सचिन गोस्वामी सरांकडूनच ओरडा मिळाला होता. म्हणजे चालू शूट थांबलं होतं. आर्ट डिपार्टमेंटने परस्पर काही गोष्टी ठरवल्या आणि एक सेटवरची गोष्ट काढून टाकली आणि मला त्याबद्दल कलपना दिली नाही. शूट सुरू झाल्यानंतर सरांना ते दिसलं नाही मग सरांनी मला विचारलं मी म्हटलं की मलाही माहीत नाही मग मी आर्ट डिपार्टमेंटशी बोललो त्यांनी मला जे सांगितलं ते मी सरांना सांगितलं त्यानंतर ते माझ्यावर खूप भडकले की आपलं काम आहे, परस्पर ठरवायचं नाही लक्ष ठेवणं वगैरे, तेव्हा मी नवीनच होतो.”
अभिनेता पुढे म्हणाला, “सर तेव्हा मला खूपच ओरडले होते इतके की प्राजक्ता माळीने माझ्या खांद्यावर हात ठेवून सांतवन केलं होतं. सर म्हणाले की पुन्हा जर असं झालं तर बॅग घेऊन घरी जायचं यायचं नाही परत असं खूप ओरडले होते, त्यानंतर रूममध्येही खूप बडबड केली. त्या दिवशी मी जेवलोसुद्धा नाही, पूर्ण दिवस निराश होतो. सेटवर इतक्या लोकांसमोर मला ओरडले म्हणून मला वाईट वाटत होतं.”
विराजने पुढे प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव यांच्याबरोबरच्या एका स्कीटमध्ये चांगलं काम केल्यानंतर सचिन गोस्वामी यांनी त्याचं कौतुक केलं होतं असाही किस्सा त्याने सांगितला.
