Vishakha Subhedar : ‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विनोदाच्या अचूक टायमिंगच्या जोरावर आजवर विशाखाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, २०२३ मध्ये त्यांनी हास्यजत्रा शोमधून एक्झिट घेतली. आजही हास्यजत्रेचे चाहते त्यांना शोमध्ये प्रचंड मिस करतात. जवळपास १३ वर्षे स्किट फॉरमॅटमध्ये काम करत असल्याने करिअरमध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं, असं त्यांनी आजवर अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. नुकत्याच ‘सिनेविस्टा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा स्मिता जयकर यांनी विशाखाला हास्यजत्रेबद्दल विचारलं. एवढी क्रेझ असताना, फॅन्सचा सपोर्ट असताना अभिनेत्रीने अचानक असा निर्णय का घेतला?
याबद्दल विशाखा सुभेदार सांगतात, “खरंच आहे मला आजही नाटकाच्या प्रयोगाला येणारे अनेकजण विचारतात, तुम्ही हास्यजत्रा का सोडली? आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. लोक अगदी आठवून माझ्या स्किटचा उल्लेख करतात. खरंतर, मी सातत्याने तेच करत होते, म्हणून मला जरा ब्रेक हवा होता. कारण, २०११ ते अगदी २०२२-२३ पर्यंत मी सातत्याने स्किट फॉरमॅटमध्ये काम केलेलं होतं. त्यामुळे एक ब्रेक गरजेचा होता. आपण एकदा कफर्ट झोनमध्ये आलो की, रिलॅक्स होऊन जातो. म्हणून मी तो निर्णय घेतला.”
विशाखा पुढे सांगतात, “अर्थात हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप जास्त अवघड होता. आपल्या सगळ्या गोष्टी सेट असतात महिन्याच्या EMI पासून वगैरे सगळंच…त्यामुळे अचानक मग कामातून ब्रेक घेणं हे एखाद्या कलाकारासाठी फार अवघड असतं. पण, तो निर्णय मी तेव्हा घेतला. कारण, मला काहीतरी वेगळं करायचं होतं. आता कॉमेडी भूमिकांमुळे लोक मला ओळखतात याचा मला निश्चित आनंद आहे. पण, या व्यतिरिक्त सुद्धा मी अनेक गोष्टी करू शकते…एक कलाकार म्हणून एक वेगळी भूमिका साकारण्याची फार इच्छा होती. याचा अर्थ असा नाही की, मी विनोदी भूमिका करणार नाही वगैरे…आता नाटकात मी विनोदी शैलीतील भूमिकाच साकारतेय. फक्त स्किट फॉरमॅटमधून सध्या ब्रेक घेतलाय. कदाचित असंही होईल की, मी पुन्हा तेच करेन. आता नशीब आपल्याला कुठे घेऊन जातंय पाहुयात.”
“हास्यजत्रा सोडणं माझ्यासाठी जराही सोपं नव्हतं पण, मी तेव्हा शांत झाले होते. पण, आपल्याला काम मिळेल हा विश्वास मनात होता. आता मी जरी तो शो सोडलाय, तरीही आजही अनेकदा मी एपिसोड पाहते. तेव्हा मग मला वाटतं, अरे मला तेव्हा हे करायला मिळालं असतं तर… किंवा आज मी शोमध्ये असते तर कदाचित हे केलं असतं…असे विचार येतात. सिनेमाच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. ही भूमिका केली असती तर बरं झालं असतं, असं मलाही कधीतरी वाटतं. पण, शेवटी ज्याच्या नशिबात जे असतं, तेच त्याला मिळतं असंही मला वाटतं. आता ‘शुभविवाह’मधील रागिणी माझ्यासाठी पूर्णपणे वेगळी होती. मला कधीच मी एवढी नकारात्मक भूमिका साकारेन असं वाटलं नव्हतं. पण, ही भूमिका अडीच वर्षे साकारताना मला फारच मजा आली.” असं विशाखा सुभेदार यांनी सांगितलं.
