Vishal Kotian on Rakhi Sawant: ‘बिग बॉस मराठी’चे सहावे पर्व संपले असले तरी या पर्वातील स्पर्धकांची अजूनही चर्चा सुरू आहे. विविध मुलाखती, सोशल मीडियावरील पोस्ट, व्हिडीओ या माध्यमातून हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही स्पर्धकांचे रियुनियनही पाहायला मिळत आहेत.
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची विजेती तन्वी कोलते ठरली, तर उपविजेता राकेश बापट ठरला. तिसऱ्या क्रमांकावर विशाल कोटियनला समाधान मानावे लागले.
विशाल कोटियन या पर्वात पहिल्या दिवसापासून होता. त्याच्या गेमचे वेळोवेळी कौतुक झाले. त्याला मास्टरमाईंडही म्हटले गेले. काही वेळा त्याच्या चुकांसाठी भाऊच्या धक्क्यावर त्याला सुनावले गेले. घरातील काही स्पर्धकांबरोबर त्याची चांगली बॉण्डिंग होती. राखी सावंत व त्याच्या मैत्रीचे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.
“राखी गेम व मैत्री हे वेगवेगळ्या…”
आता विशालने एका मुलाखतीत घरातील स्पर्धकांबद्दल वक्तव्य केले आहे. विशालने नुकतीच नवशक्तीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो राखी सावंतबद्दल बोलला. तो म्हणाला, “राखी गेम व मैत्री हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवते. गेममध्ये मैत्री नाही आणि मैत्रीचा गेम नाही. जितकी स्ट्रॉंग ती खेळाडू किंवा स्पर्धक आहे, तितकीच ती मैत्री स्ट्रॉंग ठेवते. ती तुमच्यावर जिरे, मिरची सगळं टाकू शकते आणि त्याच्याच पाच मिनिटानंतर ती तुमच्याकडून कॉफी मागू शकते. याबद्दल आपण तिला विचारलं तर ती म्हणते की तो खेळ होता, ही मैत्री आहे. देणार आहे की नाही सांग, हे इतकं सोपं आहे.”
“आम्ही तिला पैशाची बॅग उचलू दिली नाही…”
पुढे तो म्हणाला, “ती जेव्हा घरात येते, तेव्हा ती सगळ्यांना त्यांचा गेम उंचावण्यासाठी मदत करते. ती आल्यानंतर तुमचा गेम उंचावला नाही तर तुम्ही वेडे दिसाल. झोपल्यानंतर आणि सकाळी उठण्याआधीच तुम्ही शांत असता, इतर वेळी राखी सावंत असते.”
तो असेही म्हणाला, “राखी सावंत घरात आल्यानंतर सगळ्यांचाच गेम उंचावला. तिच्याबरोबर खेळायला मजा आली. हा पहिला सीझन आहे, ज्यामध्ये राखी सावंत फायनलिस्ट झाली नाही. आम्ही तिला पैशाची बॅग उचलू दिली नाही.”
बिग बॉसच्या सहाव्या पर्वात राखी सावंत पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. राखीच्या घरात येण्याने अनेक समीकरणे बदलली. सुरुवातीला ती काटा ग्रुपकडून खेळत होती. राकेशवर तिचे प्रेम असल्याचे राखीने सांगितले. जेव्हा त्याने त्याचे तिच्यावर प्रेम नाही असे सांगितले, तेव्हा राखीला वाईट वाटले.
घराबाहेर पडल्यानंतर राखीने अनेक मुलाखतीत राकेशवर तिचे प्रेम असल्याचे सांगितले. तिचे एकतर्फी प्रेम असून ती राकेशची गर्लफ्रेंड असल्याचेही तिने म्हटले होते.
दरम्यान, आता बिग बॉसमधील हे स्पर्धक कोणत्या प्रोजेक्टमधून, कोणत्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
