Vishal Nikam & Akshaya Hindalkar Wedding : ‘येड लागलं प्रेमाचं’ फेम लोकप्रिय अभिनेता विशाल निकम व अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांचा विवाहसोहळा उत्तराखंडमध्ये थाटामाटात पार पडला आहे. १० फेब्रुवारीला या दोघांची साता जन्माची गाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. अखेर विशालने त्याच्या लग्नाचा सुंदर व्हिडीओ शेअर करत त्याच्या लाडक्या सौंदर्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

विशाल निकमने ‘बिग बॉस मराठी’मध्ये असनाताच त्याच्या आयुष्यात ‘सौंदर्या’ असल्याचं सर्वांना सांगितलं होतं. आता विशालची ‘सौंदर्या’ नेमकी कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक गेली अनेक वर्षे आतुर होते. अखेर गेल्या महिन्यात विशालने ‘माझी अर्धांगिनी’ म्हणत अक्षयाचा चेहरा सर्वांसमोर रिव्हिल केला होता. आता या दोघांनी उत्तराखंडमध्ये लग्नगाठ बांधली आहे.

या जोडप्याने आधी हरिद्वारमध्ये साखरपुडा केला, यानंतर विशाल-अक्षयाचा विवाहसोहळा उत्तराखंड येथील त्रियुगीनारायण मंदिरात पार पडला आहे. हिंदू श्रद्धेनुसार, हे पवित्र स्थळ असून याठिकाणी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता.

लग्नसोहळ्यादरम्यान या दोघांनीही सुंदर लूक केला होता. नारंगी रंगाचा सुंदर लेहंगा, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा या लूकमध्ये अक्षया खूपच सुंदर दिसत होती. या दोघांच्या लग्नाला जवळचे मित्रमंडळी व त्यांचे आई-बाबा उपस्थित होते. विशाल लग्नाचा व्हिडीओ शेअर करत लिहितो, “चंद्र भागेसारखं प्रेम आपलं सखी…मी तुझ्यात सामावून जाईन, रुसली जरी तू रखुमाईसारखी मी सावळा विठ्ठल होऊन जाईन…कायम तुझा रुसवा काढून…तुला आयुष्यभर मनवत राहीन. १० फेब्रुवारी २०२६!”

विशाल-अक्षयाच्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “हे लग्न मनाला भावलं”, “किती सुंदर आणि साध्या पद्धतीने लग्न केलंय तुमचं प्रेम जिंकलं”, “तुम्हा दोघांचा हाच साधेपणा कायम भावतो”, “डोळे पाणावले…किती सुंदर लग्नसोहळा आहे हा”, “सुंदर व्हिडीओ” अशा असंख्य कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. याशिवाय मराठी कलाकारांनी सुद्धा या जोडप्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी स्टार प्रवाहच्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती.